मुलीच्या एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली शिक्षकाला तब्बल २० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 11:40 AM2022-04-20T11:40:38+5:302022-04-20T11:46:21+5:30
भामट्यांनी चाेहले यांच्या मुलीचा प्रवेश अमरावती येथील डाॅ. पंजाबराव देशमुख मेमाेरीयल मेडिकल काॅलेजमध्ये झाल्याचे सांगितले. तेथील डीनच्या बनावट स्वाक्षरीचे पत्रही दिले. हा प्रकार ते आपल्या मुलीसह अमरावतीत गेल्यानंतर उघडकीस आला.
भंडारा : मुलीच्या एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली मुंबईच्या चार भामट्यांनी येथील एका शिक्षकाला २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. गुगलवर वैद्यकीय महाविद्यालयाची यादी पाहण्यातून भामटे शिक्षकाच्या संपर्कात आले आणि अमरावतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे बनावट पत्र दिले. याप्रकरणी सोमवारी रात्री भंडारा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश गुलदास चाेहले (५१, रा. रवींद्रनाथ टागाेर वाॅर्ड, सहकारनगर, भंडारा) असे शिक्षकाचे नाव आहे. त्यांची मुलगी यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (नीट) अपेक्षित गुण मिळाले नाही. त्यामुळे खासगी महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशाची तयारी सुरू केली. प्रवेशासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. त्यावेळी त्यांनी काही वैद्यकीय महाविद्यालयांची नावे शाेधली. त्याचवेळी विजय अग्रवाल नामक व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला. त्याने एमबीबीएसला प्रवेश करून देऊ, असे सांगत मुंबईला बाेलाविले. विजय अग्रवालची भेट झाल्यानंतर त्याने अभयकुमार या व्यक्तीचा नंबर दिला. प्रवेशाबाबत बाेलण्यास सांगितले. मुंबई येथीलच एका कार्यालयात पंधरे यांच्यासाेबत ॲडमिशन प्रक्रिया आणि पैशाबाबत चर्चा झाली.
आम्ही महाराष्ट्रात एमबीबीएसचे ॲडमिशन करताे, असा बनाव करून अनुसूचित जाती राखीव काेट्यातून ॲडमिशनसाठी २० लाख रुपयांची मागणी केली. शिक्षक चोहले यांनी प्रवेशासाठी २० लाख दिले. मात्र प्रवेशासाठी दिलेले पत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी साेमवारी सायंकाळी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पाेलिसांनी विजय अग्रवाल, अभयकुमार, राहुल सिंग पंधरे (सर्व रा. मुंबई) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बनावट स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र
भामट्यांनी प्रकाश चाेहले यांच्या मुलीचा प्रवेश अमरावती येथील डाॅ. पंजाबराव देशमुख मेमाेरीयल मेडिकल काॅलेजमध्ये झाल्याचे सांगितले. तसेच तेथील डीनच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र दिले. हा प्रकार ते आपल्या मुलीसह अमरावतीत गेल्यानंतर उघडकीस आला. मुलीला डाॅक्टर करण्याच्या प्रयत्नात शिक्षकाला मात्र माेठा आर्थिक फटका बसला.
एमबीबीएस प्रवेशात फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस काॅल डिटेल्स आणि इतर मार्गाने भामट्यांचा शाेध घेत आहेत. लवकरच आराेपी जेरबंद हाेतील.
- सुभाष बारसे, ठाणेदार भंडारा