श्रीराम आख्यान: भक्त असावा तर असा! ज्याच्याशिवाय साक्षात प्रभूही अपूर्ण आहेत तो रामदूत हनुमान
By देवेश फडके | Published: April 14, 2024 12:10 PM2024-04-14T12:10:06+5:302024-04-14T12:13:49+5:30
Shriram Aakhyan: आजही श्रीरामकथा सुरु असते, तिथे एक पाट मारुतीरायांसाठी ठेवला जातो. रामकथा म्हटली की, हनुमंत येणार ही अगाध श्रद्धा अबाधित आहे.
Shriram Aakhyan: मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥ सप्तचिरंजीवांपैकी एक, केसरीनंदन, अंजनीसूत, पवनपुत्र या सर्वांपेक्षा रामभक्त, रामाचा दास, रामाचा दूत म्हणून हनुमंतांची ओळख अधिक आहे. रामायणात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई यांशिवाय राम अपूर्ण आहे, तसा तो हनुमानाशिवायही अपूर्ण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ऋष्यमुख पर्वताजवळ प्रथम श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली, असे सांगितले जाते. त्या भेटीपासून रामावतार पूर्ण होईपर्यंत हनुमान कायम रामासोबत राहिला. श्रीराम हे हनुमंतांचे आराध्य आणि आपल्या आराध्यांना कशाचीही कमतरता भासू नये, यासाठी हनुमंत नेहमीच तत्पर असायचे.
सीताशोधार्थ सुग्रीवाने पाच पथके तयार करून चारही दिशांना पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या बोटातील एक अंगठी रामाने फक्त हनुमानाजवळ दिली. इथे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की, केवळ हनुमानच का, अनेक जण तिथे होते. सुग्रीव होता, अंगद होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रामाचा हनुमानावर असलेला विश्वास. रामाला हनुमानावर विश्वास होता की, हाच असा व्यक्ती आहे, जो हे काम लीलया पार पाडू शकेल. हनुमंत कुणी साधारण नव्हते. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. प्रचंड बुद्धिमान, युक्ती आणि शक्तीचा अद्भूत संगम म्हणजे हनुमंत. दक्षिण तीरावर जाम्बूवंत, अंगद, हनुमान यांच्यासह पथकातील अन्य जण पोहोचले. तेव्हा संपातीने लंका नामक द्विपात अशोकवाटिका येथे सीतामाई असल्याचे सांगितले. अथांग समुद्राचे उल्लंघन करून जाणार कोण, हा प्रश्न सर्वांचा पडला. तेव्हा हनुमान काहीच बोलत नव्हता. कारण, दुर्वास ऋषींच्या एका शापामुळे आपल्या अंगी प्रचंड बळ आहे, हे त्याला मुळात आठवत नव्हते. अखेर जाम्बुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. हनुमानाचे विस्मरण काढले आणि हनुमानाने कौशल्याचा वापर करून लंका गाठली.
लंकेत जेव्हा मारुतीराय पोहोचले, तेव्हा बिभीषणाशी प्रथम ओळख झाली. हनुमानाने आपल्या येण्याचे प्रयोजन आणि श्रीरामांविषयी बिभीषणाला सांगितले. चातुर्याने बिभीषणाला आपल्या बाजूने करून घेतले आणि पुढे रामाशी भेट घालून दिली. तत्पूर्वी, लंकेत पोहोचल्यानंतर हनुमानाने अगदी चाणाक्षपणे सीतामाईचा शोध घेतला. सीतामाईला हनुमानावर विश्वास बसेना. तेव्हा हनुमानाने आपली ओळख अमुकाचा मंत्री, अमुकाचा पुत्र अशी करून न देता रामाचा दूत म्हणून करून दिली. तसेच रामाने दिलेली अंगठी खूण म्हणून दाखवली. लवकरच तुम्हाला श्रीराम येऊन येथून सोडवतील, असा विश्वास हनुमानाने सीतामाईला दिला. येथे एका कथेनुसार, सीतामाईने हनुमानाला आपण भेटल्याची खूण म्हणून अशी एक गोष्ट सांगितली की, जी फक्त राम आणि सीता यांनाच ठाऊक होती. यावरून श्रीराम आणि सीतामाई यांचा हनुमानावर किती विश्वास होता, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. रामाला जेवढा विश्वास हनुमानावर होता, तेवढाच विश्वास हनुमानाला रामावर होता. कारण आपले आराध्य कधीही काही वावगे करू शकत नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम आदर्शांचे आदर्श आहेत, हे हनुमानाला पूर्णपणे माहिती होते.
रावण नेमका कोण आहे, हे हनुमानाला पाहायचे होते. म्हणून त्याने उपद्रव करून स्वतःला बंदिवान करून घेतले. रावणाच्या दरबारात दाखल होऊन सर्व गोष्टी नीटपणे निरखून पाहिल्या. रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधून आग लावली. येथे हनुमानाने युक्तीचा वापर करून सर्व लंका पेटवून दिली. रामाचा एक छोटा सैनिक एवढा गहजब करू शकतो, तर प्रत्यक्ष राम लंकेत आल्यावर काय होईल, असा संदेश लंकेला द्यायला होता. येथे हनुमंतांच्या मुसद्दीपणाचा एक नमुना दिसतो. लंकेचे सर्व योग्य पद्धतीने निरीक्षण करून हनुमान परत येतो आणि लंकेत नेमके कुठे काय आहे, याची माहिती रामाला देतो. हनुमानाच्या या कामगिरीवर राम अगदी प्रसन्न असतो.
हनुमान परत आल्यावर रामाला झालेला आनंद अतिशय अवर्णनीय असाच आहे. आपण ठेवलेला विश्वास हनुमानाने सार्थ ठरवला, याचे समाधान रामाला वाटते. तसेच, हनुमानाने सांगितलेल्या गोष्टीवरून सीताच भेटली होती, हेही रामाला समजते. तत्काळ योजना आखून सुग्रीव, हनुमंत आणि सर्व वानरसेना दक्षिण किनाऱ्यावर पोहोचतात. श्रीराम सागराचे आवाहन करतात. सागर प्रकट होतो आणि सेतू बांधण्याचे सुचवतो. लगेचच सर्वजण सेतू बांधायला घेतात. सेतूबंधनावेळेची एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. सर्वजण अपार मेहनत आणि कष्ट घेऊन सेतूबंधन करत असतात. आजूबाजूचे दगड, वृक्ष घेऊन समुद्रात टाकत असतात. जी जी गोष्ट समुद्रावर टाकली जाणार असते, त्या प्रत्येक गोष्टीवर रामनाम लिहिले जाते. हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईनेही सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. सर्व जण कठोर मेहनत घेत आहेत, हे पाहून रामालाही राहावत नाही. रामही एक दगड घेतो आणि समुद्रात टाकतो. मात्र, तो दगड बुडातो. ही गोष्ट वारंवार घडते. तेव्हा हनुमान रामाजवळ येतो आणि सांगतो की, भगवंत, जो रामनामाशी एकरूप झाला, तो तरला. परंतु, खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचे बुडणे निश्चित आहे. हनुमानाचे उत्तर ऐकून श्रीराम प्रसन्न होतात. यावरून रामनामाचा आणि रामाचा महिमा किती कालातीत आणि अपार आहे, याची प्रचिती येते.
पुढे इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध होते. तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध होतो. संजीवनी आणण्यासाठी कोण जाणार असा प्रश्न उभा राहतो. पुन्हा एकदा राम भक्तश्रेष्ठ हनुमानावरच विश्वास दाखवतो. रामकार्य म्हटल्यावर हनुमान एका रात्रीत संजीवनी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला नवसंजीवनी मिळते. रावणाविरोधात झालेल्या युद्धात हनुमान पराक्रमाची पराकाष्टा करतो. रामाला जितके सहाय्य करता येईल, तेवढे तो करतो. श्रीराम आणि सीतामाईसह पुढे अयोध्येला जातो. दास्यत्वाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. वास्तविक हनुमान रावणाला धडा शिकवून सीतामाईला परत घेऊन येण्यास समर्थ होता. कुणीही हनुमानाचे काहीही वाकडे करू शकले नसते. पण, रामाने केवळ सीतेचा शोध घेऊन यायला सांगितले होते. रामाची आज्ञा केवळ शोध घेऊन परत येणे एवढीच आहे. त्यामुळे रामाची आज्ञा तंतोतंत पाळणे हे रामदूत आणि रामाचा दास असलेल्या हनुमानाचे प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव हनुमानाला होती.
श्रीराम देखील हनुमंतांची योग्यता ओळखून असतात. दास्यत्व पत्करले असले तरी, राम कधीही हनुमानाला कमी लेखत नाही. हनुमानाचा आदर करतो. इथे दास आणि आराध्य या दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हनुमानही कधी आपली मर्यादा ओलांडत नाही आणि रामही हनुमानाला कमीपणा येईल, असे काही करत नाही. उलट दासाला कधीही दिले नसेल, असे वरदान राम हनुमानाला देतो. अयोध्येला परत आल्यानंतर श्रीराम सर्वांचा यथोचित सत्कार करतात. ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचा प्रचंड मोठा कौतुक सोहळा पार पडतो. हनुमंत श्रीरामांसमोर आल्यावर, ‘प्रभो, मज एकच वर द्यावा। या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा॥’ असे सांगत, ‘जोंवरि भूवर रामकथानक तोंवर जन्म असावा॥ जोंवरि हें जग। जोंवरि भाषण, तोंवरि रामकथेचा स्वाद मला द्यावा॥’, असे मागणे करतो. तसेच ‘सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी। फिरेन अवनीं, फिरेन गगनी॥’, असे आश्वासन देतो. हनुमंतांनी श्रीरामचरित्र, रामकथा यांचे एकप्रकारे पसायदान येथे मागितले आहे. रामकथेला जणू अमरत्व प्राप्त करून दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अंजनीमातेचा बलाढ्य पुत्र, गरुडाहून बलवान, सर्व देव-देवतांचे आशीर्वचन लाभलेला, श्री विष्णूंकडून कोणतेही शस्त्र रणांगणावर भेदू शकणार नाही, इच्छामरणाचे वरदान मिळालेला, जल-अग्नी यांपासून अभय असलेला, प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा, असा भीमरूपी हनुमंत श्रीरामांकडे काय मागतो? तर, ‘कधिं न चळावे चंचल हें मन। श्रीरामा, या चरणांपासून॥’, अशी थोरवी हनुमंतांची सांगितली जाते. श्रीरामही हनुमानावर अगदी प्रसन्न असायचे. कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा म्हणून नाही, तर आपण दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा. कोणतेही काम असो युक्ती, सद्सद्विवेकबुद्धी आणि वेळ पडली तर शक्ती वापरून तडीस न्यायचा. हनुमंतांचा हाच गुण श्रीरामांना प्रचंड आवडत असे. म्हणूनही आजच्या काळातही जिथे जिथे श्रीरामकथा सुरू असते, तिथे तिथे एक पाट मारुतीरायांसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीरामकथा म्हटली की, हनुमंत तिथे येणार ही अगाध श्रद्धा अबाधित आहे.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
- देवेश फडके.