श्रीराम आख्यान: अहल्या, शबरी, तुलसीदास; रामनाम हा एकच ध्यास! श्रीरामाशिवाय ज्यांचं आयुष्य अपूर्ण होतं...
By देवेश फडके | Published: April 15, 2024 01:30 PM2024-04-15T13:30:26+5:302024-04-15T13:31:47+5:30
Shriram Aakhyan: वनवासाला असताना श्रीरामांनी अनेकांचा उद्धार केला. तर अनेकांनी श्रीरामांना आपले आराध्य मानले. रामकार्यासाठी शक्य ती सर्व मदत केली.
Shriram Aakhyan: श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. श्रीरामांबद्दल जेवढे बोलावे, ऐकावे, स्मरावे तेवढे कमीच आहे. रामायणाबाबत किंवा रामचरित्राबाबत नाक मुरडणारेही अनेक आहेत. श्रीराम आणि रामायण कालातीत नाही, तर कल्पनामय आहेत, असेही म्हणणारे अनेक जण सापडतात. मात्र, त्यामुळे श्रीरामांचे महत्त्व आणि महात्म्य यत्किंचित कमी होत नाही. रामाने केवळ आदर्श प्रस्थापित केले नाहीत, तर अनेकांचा उद्धारही केला. विश्वामित्रांसोबत धर्मरक्षण करताना आणि १४ वर्षे वनवास भोगताना श्रीराम अनेकांचे आराध्य झाले. अनेक युगे लोटली तरी रामनामाचा महिमा कमी झालेला दिसत नाही, उलट उत्तरोत्तर वाढताना दिसतो, यातच सर्व काही आले.
धर्मरक्षणासाठी बाहेर पडलेले राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत मार्गक्रमण करत असतात. या मार्गात राम आणि लक्ष्मण यांना विविध गोष्टींची माहिती, ज्ञान प्राप्त होते. राजकुमारांसमवेत विश्वामित्र गौतम ऋषींच्या उजाड आश्रमाजवळ पोहोचतात. विश्वामित्र रामाला गौतम ऋषी आणि अहल्येची गोष्ट सांगतात. विश्वामित्र ऋषी श्रीरामांना आश्रमात जाऊन अहल्येचा उद्धार करण्याची आज्ञा देतात. गौतमांच्या शापामुळे रामाशिवाय इतर कोणीही अहल्येला पाहू शकत नव्हते. श्रीरामांचे दर्शन होताच अहल्या इतरांना दिसू लागते. अनेक रामायणात अहल्या शिळा झाली होती. श्रीरामांच्या चरणस्पर्शाने पुन्हा स्त्रीरुपात आली, असा उल्लेख आहे. परंतु, गौतम ऋषींच्या शापामुळे तिचा बाह्य जगाशी संपर्क नव्हता, म्हणजे ती शिलेसमान होती. श्रीरामांच्या स्पर्शाने तिला शुद्धत्व आले. समाजाने बहिष्कृत केलेल्यांना पुन्हा सन्मानाने प्रवाहात आणण्याची गरज श्रीरामांनी दाखवून दिली, असे याचे तात्पर्य सांगितले जाते.
पुढे वनवासात असताना श्रीराम आणि लक्ष्मण मतंग ऋषींच्या आश्रमात आले. काही कथा आणि मान्यतांनुसार, दंडकारण्यात एका वस्ती प्रमुखाची लेक, अवघ्या दहा वर्षांची शबरी आपले निरागस बालपण जपत होती. लहानपणी खेळताना अंगणातील बोकडाच्या पिल्लांशी शबरीची एकदम घट्ट गट्टी झाली. मात्र, पुढे विवाहकार्यात या बोकडाच्या पिल्लांचा बळी जाणार म्हटल्यावर शबरी सावधान झाली. शेवटी पिल्लांचा जीव वाचावा, यासाठी विवाहकार्य सोडून शबरी घरातून बाहेर पडली. अनेक दिवस पायपीट केल्यानंतर अखेर मतंग ऋषींच्या आश्रमात आली. आश्रम कुणाचा? ऋषी कोण? अशी कोणतीही माहिती नसताना शबरीने पहाटे उठावे, झाडलोट करून आश्रमाची स्वच्छता करावी आणि पुन्हा झाडावर चढून बसावं हा दिनक्रम आखला. आपला आश्रम इतका वेळेत स्वच्छ कसा होतो, हे पाहून सुरुवातीला मतंग ऋषींना आश्चर्य वाटले, मात्र हे आपल्या शिष्यांचे काम नव्हे हे त्यांनी ताडले. याचा छडा लावण्यासाठी रात्रभर जागून ऋषींनी सकाळी छोट्या शबरीला पकडले. प्रेमाने तिची विचारपूस केली. घाबरलेल्या शबरीच्या तोंडातून शब्दही फुटेना. मग ऋषींनीच तिची अवस्था जाणून तिला याच आश्रमात राहण्यास सांगितले. त्या दिवसापासून शबरी त्या आश्रमाची लेक झाली, अशी एक कथा सांगितली जाते.
आश्रमात अनेकांनी सेवा करत तिने एक सुंदर उद्यान फुलविले, दिवस आनंदात जात असतानाच मतंग ऋषींना भगवंताकडून समाधीचा संदेश मिळाला. छोटी शबरी आश्रमात होणारे संवाद ऐकत होती. मात्र, लहान असल्यामुळे कशाचाच अर्थबोध होत नव्हता. अखेर न राहून तिने ऋषींना प्रश्न केला की, उद्धार म्हणजे काय? माझा उद्धार व्हावा यासाठी काय करु? यावर ऋषी उत्तरले की, काळजी करू नकोस, तुझा उद्धार आपोआपच होणार आहे. तुझ्या उद्धारासाठी प्रभु श्रीराम स्वतः येथे येतील. पुढे श्रीराम कसे दिसतात, हेही तिला माहिती नव्हते. ते कधी येतील, याचीही कल्पना नव्हती. अगदी त्या दिवसापासून ते श्रीराम भेटीपर्यंत शबरीने केवळ आणि केवळ नित्यकर्मांसोबत श्रीरामदर्शनाची आस धरून ठेवली. शबरीची भक्ती ही एक आदर्श होती. शरीर जर्जर झाले तरी प्रभुंच्या दर्शनाशिवाय श्वास थांबणार नाही, या आशेवर शबरी जगत होती. मुखी फक्त श्रीरामांचे नाव असायचे. अशातच दोन पावलांवर तिची नजर पडली, त्यापाठोपाठ आणखी दोन पावले दिसली. भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहोचलेल्या शबरीने पावलांवरूनच दैवत्वाची खुण पटवली. साश्रु नयनांनी शबरीने मान उंचावली. अखेर श्रीरामदर्शनाने शबरी तृप्त झाली.
देवाला काही अर्पण करताना ते सर्वोत्तम, सर्वोच्च असावे, अशीच प्रत्येकाची भावना असते. रोजच्या व्यवहारात आपण कसेही आणि काही केले तरी एखाद वेळेस चालून जाते. मात्र, आराध्य आणि देवाचा संबंध येतो, तेव्हा आपण सजग असतो. अगदी पूजेसाठी मांडायच्या पाटापासून ते नैवेद्याच्या ताटापर्यंत सर्व यथोचित आणि उत्तमच असावे, असा आपला आग्रह, अट्टाहास असतो. त्याप्रमाणेच शबरीने प्रभू श्रीरामांसाठी वेचून आणलेली फळे गोड आणि चांगली आहेत की नाही हे पाहण्यासाठी चाखली असावीत. शबरीने चाखलेली बोरे आणि फळे पाहून लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. तरीही रामाने प्रेमभराने त्याचा केलेला स्वीकार हा शबरीच्या वर्षानुवर्षाच्या भक्तीची पोचपावती होती, असे म्हटले जाते. शबरी - राम भेटीमध्ये जो संवाद झाला, त्यात राम आणि लक्ष्मण यांची सीताशोधार्थ चाललेली वणवण शबरीला कळते. श्रीराम दक्षिण दिशेला जाणार हे जाणून घेतल्यावर शबरी श्रीरामांना हनुमान, सुग्रीव यांची मदत घेण्याचे सुचविते. त्यांचे सहाय्य घेण्याचेही सुचवते. त्यामुळे सीता शोध सुकर होईल आणि असुर, राक्षसी, अधर्मी शक्तीचा नाश होईल, हा विश्वास ती रामाला देते. हा दिशासंकेत श्रीरामांना शबरीकडून मिळतो. त्या संकेताचे पालन श्रीराम करतात, अशी कथा प्रचलित आहे.
रावणाने सीताहरण केल्यानंतर पुष्पक विमानातून घेऊन जात असताना जटायूने प्रतिकार केला होता. रावणाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटले आणि जटायू खाली कोसळला. जटायू राजा दशरथांचा मित्र होता. त्यामुळे जोपर्यंत राम आणि लक्ष्मण येत नाहीत, तोपर्यंत जटायूने सर्व बळ एकवटून ठेवले होते. जटायूने रामनावाचा धावा सुरू केला. सीतामाईच्या शोधात प्रभू रामचंद्र या भागातून जात असताना जटायूस पाहिले. जटायूने श्रीरामांना घडलेला प्रकार सांगितला. श्रीरामांनी बाण मारून पाणी उत्पन्न केले आणि जटायूला पाजले. अखेरीस जटायूने देह ठेवला. श्रीराम आणि लक्ष्मण यांनीच जटायूचे पुढील विधी केले, असे सांगितले जाते.
वनवासात असताना श्रीराम अनेक ऋषी, मुनी यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या भेटी घेत असतात. त्यांचे मार्गदर्शन श्रीरामांना मिळत असते. श्रीरामही ऋषींचे श्रेष्ठत्व आणि महात्म्य जाणून असतात. आपण राजपुत्र आहोत, या गोष्टीचा ते कधीही अभिमान बाळगत नाहीत. उलट जे जे महत्तम भेटतात, त्यांच्यासमोर श्रीराम आदराने नतमस्तक होतात. अभिवादन करतात. आपण कुणीही असलो, तरी समोरच्याला कधीही कमी लेखायचे नाही. आदर करायचा. मतं पटली नाहीत, तरी आकस न बाळगता शांतपणे आपले मत पटवून देणे किंवा समोरच्या व्यक्तीच्या मतांचा आदर राखणे, असे अनेकविध गुण श्रीरामांकडून घेण्यासारखे आहेत. म्हणूनच या वनवासाच्या प्रवासात सुग्रीव, अंगद, नल-नील, बिभीषण यांसह शेकडो, हजारो जणांचे श्रीराम आराध्य झाले, श्रद्धास्थान झाले. रामायणात अशा अनेकांची नावे घेता येतील, ज्यांनी श्रीरामांना आपले देव, आराध्य मानले. श्रीरामांची महती वर्णावी तेवढी कमीच आहे.
वाल्मिकी रामायणानंतर सर्वांत प्रमाण रामकथा मानली जाते ती म्हणजे रामचरितमानस. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या रामचरितमानस यांची शेकडो वेळा पारायणे केलेल्या अनेक व्यक्ती सापडतील. श्रीराम हे तुलसीदासांचे आराध्यच. तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालीन हिंदू समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले. भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत. सामान्य लोकांमध्येही तुलसीदासांनी जनजागृती केली. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकाराची सुरुवात केली. काशी आणि अयोध्या येथे श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती, असे मानतात. संस्कृतमधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून त्याचे नाव रामचरितमानस ठेवले. हे लेखन गोस्वामी तुलसीदास यांनी केवळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते, असे सांगितले जाते.
‘जय जय रघुवीर समर्थ’, असा जयघोष करत महाराष्ट्रभर भ्रमण करणाऱ्या समर्थ रामदास स्वामी यांनी उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना तळगाळातील समाजापर्यंत पोहोचावी, यासाठी हनुमान आणि श्रीराम यांनाच आराध्य मानले आणि समाज प्रबोधन केले. समर्थ रामदास स्वामींनी १२ वर्षे तपश्चर्या केली, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण केले. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले, असे मानले जाते. उपासनेच्या सामर्थ्यासाठी साधकावस्थेमध्ये समर्थ रामदास स्वामींनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली. तर सामर्थ्याच्या उपासनेसाठी विविध ठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. यातील ११ मारुती मंदिरे प्रसिद्ध आहेत. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे. हनुमानाची उपासना केली पाहिजे, असा समर्थांचा विचार होता. हाच विचार समर्थ रामदास स्वामींनी समाजात रुजवला आणि वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले.
वाल्मिकी रामायण, रामचरितमानस यांच्यासह अनेक भाषांमध्ये विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. महाराष्ट्रातील मोरोपंतांनी तर १०८ प्रकारची रामायणे लिहिली आहेत. पैकी शब्दसामर्थ्याचा उत्तम नमुना म्हणजे मोरोपंतांचे निरोष्ठ रामायण. म्हणजेच या रामायणात मोरोपंतांनी ‘प, फ, ब, भ, म’ अशी अक्षरे न वापरता रामायणाची रचना केली. याच पंगतीत आदराचे आणि वरच्या पायऱ्यांवर येणारे नाव म्हणजे संत एकनाथ महाराज. नाथ महाराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ‘भावार्थ रामायण’ हा प्रेरणादायी अपूर्व ग्रंथ रचला. मराठी भाषेच्या आरंभ काळापासून निर्माण झालेल्या श्रीविठ्ठलाच्या भक्तिसंप्रदायात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या संत एकनाथांनी परिपाठी सोडून मराठी भाषेत प्रथमच संपूर्ण रामकथा लिहिली, असे सांगितले जाते. सर्व विश्वामध्ये गुणवत्ता आणि लोकप्रियता अखिल जीवितांचे-संसाराचे सारसर्वस्व म्हणजेच ‘भावार्थ रामायण’ होय. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात.
आदर्श, अतुलनीय पराक्रम, असाधारण त्याग, अपार कारुण्याची वीरगाथा ‘रामायण’ या चार अक्षरात समूर्त झाली आहे. श्रीराम हे अद्भूत रसायन आहे, याची भूल पडल्याशिवाय राहत नाही. रामायण घडून इतकी वर्षे लोटली तरीदेखील रामकथेची ओढ कमी होत नाही. कलियुगातही रामचरित्राचे आकर्षण आणि श्रीरामांविषयी असलेला आदर देशभरात सादर होणाऱ्या रामकथा आणि अयोध्येत बांधल्या गेलेल्या श्रीराम मंदिरावरून प्रत्यक्षात दिसून येतो.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥
- देवेश फडके.