गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:30 PM2024-05-08T12:30:42+5:302024-05-08T12:32:55+5:30

Guru Shukra Asta Vivah Muhurat: गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह विवाह संस्कारासाठी महत्त्वाचे मानले जातात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

guru and shukra asta 2024 know about why vivah muhurat only in july and november after may month | गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे

गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे

Guru Shukra Asta Vivah Muhurat: भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये विविध गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात शुभ मुहुर्तावर करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे असल्याचे पाहायला मिळते. अगदी घरातून निघण्यापासून ते विविध प्रकारचे विधी, होम-हवन, विवाह, विशेष पूजा अनेकविध गोष्टींसाठी मुहूर्त पाहिले जातात. सोने-चांदी खरेदीसाठीही मुहूर्त पाहिले जातात. भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे विवाह करताना विशेषत्वाने मुहूर्त पाहिले जातात. केवळ मुहूर्त नाही, तर विवाह करताना ग्रहबळही पाहिले जाते, असे म्हणतात. नवग्रहांमध्ये गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह महत्त्वाचे मानले गेले असून, मे महिन्यात हे दोन्ही ग्रह अस्तंगत असणार आहेत. त्यामुळे विवाहासाठी आता जुलैमध्ये विवाहासाठी काही मुहूर्त असून, त्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त असतील, असे सांगितले जात आहे. 

एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवर असतो, तेव्हा तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. पृथ्वीवरून हा ग्रह दिसत नसल्याने या स्थितीला तो ग्रह अस्त पावला, असे समजले जाते. सूर्यापासून दूरच्या अंतरावरून ग्रह मार्गक्रमण करू लागला की, तो ग्रह पृथ्वीवरून दिसतो. त्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे सांगितले जाते. विद्यमान स्थितीत वृषभ राशीत सूर्य आणि गुरु तसेच शुक्र ग्रह आहेत. त्यामुळे गुरु आणि शुक्र अस्तंगत आहेत. हे दोन्ही ग्रह अस्तंगत असल्यामुळे विवाह, उपनयन संस्कार, गृहप्रवेश तसेच अन्य मंगल कार्यासाठी मुहूर्त नसल्याचे सांगितले जात आहे.

अक्षय्य तृतीया विशेष महत्त्वाचा दिवस

संपूर्ण वर्षात काही दिवस असे असतात की, त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास विशेष मुहूर्त पाहावे लागत नाही. तो दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यास उत्तम मानला जातो. अक्षय्य तृतीया हा असाच एक दिवस आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे हा दिवस शुभ कार्ये करण्यास चांगला मानला जातो. काही ज्योतिषांच्या मते, या दिवशी विविध प्रकारची शुभ कार्ये केली जाऊ शकतात. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त पुण्यफलदायी मानला गेला आहे. या दिवशी केलेले पुण्य अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. 

गुरु-शुक्र कधी होणार उदय? 

मे महिन्यात अस्तंगत असलेले गुरु आणि शुक्र ग्रहांचा अनुक्रमे ३ जून आणि ७ जुलै रोजी उदय होणार आहेत. त्यामुळे ७ जुलैनंतर विवाहासाठी शुभ मुहूर्त असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही विवाह करण्याचे ठरवत असल्यास संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा. वर आणि वधुची जन्मपत्रिका, ग्रहबळ आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टी पाहून मगच त्या दोघांसाठी कोणता मुहूर्त विवाहासाठी अत्यंत शुभ ठरू शकेल, याचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करू शकतात. जुलै महिन्यात ९, ११, १२, १४ आणि १५ या तारखा विवाहासाठी योग्य ठरू शकतात, असे काहींचे म्हणणे आहे. त्यानंतर १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून, चातुर्मास सुरू होत आहे. १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी देवउठनी कार्तिकी एकदाशी आहे. अनेक ठिकाणी चातुर्मासात शुभ कार्ये केली जात नाहीत.

गुरु-शुक्राचे विवाह संस्कारातील महत्त्व

गुरु ग्रह सुखकारक मानला गेला असून, शुक्र ग्रह हा पतीकारक मानला जातो. विवाहानंतर दोघांचा संसार कसा होऊ शकेल, या गोष्टी गुरुवरून पाहिल्या जातात. तर शुक्रावरून पती-पत्नीमधील नाते कसे असू शकेल, असे पाहिले जाते.  त्यामुळे हे दोन्ही ग्रह सुस्थितीत असणे महत्त्वाचे मानले गेले आहे. गुरु आणि शुक्र हे शुभ ग्रह मानले जातात. चांगल्या वैवाहिक जीवनासाठी गुरु-शुक्र कारक ग्रह मानले गेले आहेत. 
 

Web Title: guru and shukra asta 2024 know about why vivah muhurat only in july and november after may month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.