डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

By शिरीष शिंदे | Published: May 4, 2024 06:15 PM2024-05-04T18:15:02+5:302024-05-04T18:16:22+5:30

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत होतेय वाढ; ३१४ टँकरवर सव्वापाच लाख लोकांची भिस्त

Fire in head, threat to scarcity; In Beed, 5.25 lakhs people's eye the tanker | डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

डोक्यावर आग, टंचाईमुळे पोटात गोळा; बीडमध्ये सव्वापाच लाख लोकांचा टँकरकडे डोळा

बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आजघडीला जिल्ह्यातील ५ लाख ३७ हजार ४७ लोकांची तहान ३१४ टँकरद्वारे भागविली जात आहे. दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या वर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार ७१ टक्के पाऊस झाला आहे. परंतु, या पावसामुळे नद्या खळखळून वाहिल्या नाहीत. परिणामी, लहान-मोठ्या तलावांत पाणीसाठाच झाला नाही. त्या-त्या वेळी पडलेल्या पावसामुळे फारशी पाणीटंचाई जाणवत नव्हती. दरम्यान, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर जानेवारी महिन्यातसुद्धा अवकाळी बरसला. त्यामुळे थोडाफार आधार निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे बाष्पीभवन वेगाने झाले. परंतु, आता उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसभराच्या अति उन्हामुळे जमीन तप्त होत आहे. पाणीपातळी खालावली असल्याने ग्रामीण भागात जलस्रोतच शिल्लक राहिलेले नाहीत. पर्याय नसल्यामुळे गावे, वाड्यामधून टँकर मागणीत वाढ होऊ लागली आहे. तहसीलदारांकडे अर्ज दाखल केल्यानंतर उपविभागीय अधिकारी टँकरला मंजुरी देत आहेत. ज्या ठिकाणी टँकरची मागणी होत आहे त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ टँकरची सोय केली जात आहे.

शासकीय टँकर केवळ दोनच
बीड जिल्ह्यातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच टेंडर काढलेले आहे. त्यानुसार पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडे टँकरच नसल्याने खासगी टेंडर काढावे लागले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

४५१ गाव-वाड्यांची सोय
बीड जिल्ह्यात २४३ गावे तर २०८ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय २ तर खासगी ३१२ टँकरद्वारे ही सेवा दिली जात आहे. संबंधित टेंडरधारकास ७३९ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७१८ खेपा पूर्ण झाल्या असून, मागणी अधिक असल्याने २१ खेपा कमी झाल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

२५९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण
ग्रामीण भागातील लोकांना गावातच पाण्याची सोय व्हावी यासाठी २५९ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना त्या ठिकाणावरून पाणी मिळत आहे. तसेच टँकरसाठी ६६ बोअर, विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. जलस्रोत लांब किंवा उपलब्ध नसल्याने ही सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणचे जलस्रोत आटल्यामुळे काही बोअरचा आधार घेतला जात आहे.

शहरी भागातही पाण्याच्या झळा
केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बीड नगर पालिकेच्या वतीने पूर्वी ८ दिवसाला पाणी दिले जात असे; परंतु, आता २५ दिवसाला पाणी सोडले जात आहे. शहरी भागातील नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुका-टँकरवर अवलंबित लोकसंख्या - एकूण सुरू टँकर
बीड - २,०५,९२४ - ११२
गेवराई - १,५८,७०९ - ९८
वडवणी - १७,४७९ - ११
शिरुर - ३७,७२० - २९
पाटोदा - २३,११७ - १३
आष्टी - ४८,८३७ - २७
अंबाजोगाई - ३,८९८ - २
केज - ६,३५० - ४
परळी - १७,७०७ - ७
धारुर - १४,४३४ - ९
माजलगाव - २,८७२ - २
एकूण - ५,३७,०४७ - ३१४

Web Title: Fire in head, threat to scarcity; In Beed, 5.25 lakhs people's eye the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.