Namantar Andolan : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:33 PM2019-01-14T13:33:29+5:302019-01-14T13:34:28+5:30

१९७७ पासून सुरू झालेला नामांतराचा लढा पुढे १६ वर्षे सातत्याने लढला गेला. नामांतराची मागणी असलेल्या या लढ्याची अखेर १४ जानेवारी १९९४ ला नामिविस्ताराने झाली.

Namantar Andolan: Know, 'Namantar to Namavistara' day by day happenings... | Namantar Andolan : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम...

Namantar Andolan : जाणून घ्या, 'नामांतर ते नामविस्तार' घटनाक्रम...

Next

विद्यापीठ नामांतर आंदोलनाची वाढणारी व्याप्ती व तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने नामांतराचा प्रस्ताव एकमताने समंत करून मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या निर्णयाचे हिंसक पडसाद तात्काळ मराठवाड्यात उमटले. यानंतर १९७७ पासून सुरू झालेला नामांतराचा लढा पुढे १६ वर्षे सातत्याने लढला गेला. नामांतराची मागणी असलेल्या या लढ्याची अखेर १४ जानेवारी १९९४ ला नामिविस्ताराने झाली.

१) २६ जून १९७४- नामांतराची पहिली मागणी केली गेली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र वाहूळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठवाड्यातील विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली. 

२)१६ जुलै १९७४- मुख्यमंत्री सचिवालयाने मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाला पत्र लिहून मागणीचे नोंद घेतली. 

३) ७ जुलै १९७७- मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी जाहिर मागणी प्रथम दलित पँथरचे सरचिटणीस  गंगाधर गाडे यांनी केली. 

४)१७ जुलै १९७७ - औरंगाबादच्या सरस्वती भुवनच्या प्रांगणात सर्वपक्षीय विद्यार्थी -युवक संघटनांनी एकत्र येऊन विद्यार्थी कृति समितीची स्थापणा केली.  या समितीत युवक क्रांती दल, युवक काँग्रेस, अ.भा.वि.प.जनता युवक आघाडी, समाजवादी क्रांती दल, एस.एफ.आय., दलित युवक आघाडी, युवा रिपब्लिकन , दलित पँथर, पुरोगामी युवक संघटनेचा समावेश होता. या बैठकीत इतर मागण्यासह मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. 

५) १७ जुलै १९७७-  नामांतरासाठी पहिले जाहिर आंदोलन विद्यार्थी कृति समितीने पुकारले ते गुलमंडीवर एका दिवसाची धरणे देऊन. त्यात गणेश कोठेकर, अनिल महाजन, प्रवीण वाघ, विजय गव्हाणे, ज्ञानोबा मुंडे, पंडित मुंडे आदींचा प्रमुख सहभाग होता. 

५) १८ जुलै १९७७- विद्यार्थी कृति समितीने कॉलेज बंदचे आवाहन केले त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. त्यासह समितीने एक मोठा मोर्चा विद्यापीठावर काढला. त्याच दिवशी विद्यापीठ कार्यकारणीची बैठक होती. या मोर्चात सर्व जातीय व सर्व पक्षीय नेत्यांचा समावेश होता. राम गायकवाड, गणेश कोठेकर, प्रविण वाघ, नामदेव रबडे, श्रीरंग वारे, भीमराव लोखंडे, प्रदीप देशपांडे, ज्ञानोबा मुंडे, तुकाराम पांचाळ, नागरगोजे,सुभाष लोमटे, जैन, एकबाल, अनिल महाजन, संग्राम मुंडे, राम दुतोंडे, कीर्ती डेलिवाल हे प्रमुख होते. 
-विद्यार्थी कृति समिती व दलित पँथरमध्ये येथे मतभेद होऊन दोन स्वतंत्र निवेदने विद्यापीठाला देण्यात आली. 
-विद्यापीठ कार्यकारणीने विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा एकमुखी ठरावही याच बैठकीत पारित केला. तेव्हा कुलगुरू भोसले , वसंतराव काळे, आ. किसनराव देशमुख,प्राचार्य राजाराम राठोड यांचा कार्यकारणीत समावेश होता. 

६) १८ जुलै १९७७- प्राचार्य संदानशिव यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्गीय प्राध्यापकांचा मोर्चाही विद्यापीठावर धडकला. 

७)१८ जुलै १९७७- विद्यापीठास मौलाना आझाद यांचे नाव द्या, अशी मागणी करणारे निवेदन अहमद रझा रझवी, सिराज देशमुख, एस.एन. काद्री, मिर्झा शाहिन बेग यांनी विद्यापीठा दिले होते. 

८) १९ जुलै १९७७- विद्यार्थी कृति समितीतर्फे परभणीत मोर्चा काढण्यात आला. रामराव जाधव व माधव हातागळे यांनी नेतृत्व केले. बीड, जालना येथेही मोर्चे निघाले.

९) याच दरम्यान काही वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कार्यकारणीस निवेदने देऊन विद्यापीठास स्वामी रामानंद तीर्थांचे नाव देण्याची मागणी केली. 

१०) २१ जुलै १९७७- नामांतराल्ल विरोध करणारा पहिला मोर्चा निघाला. इंजिनिअरिंग, सरस्वती भुवन, देवगिरी, विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. या मोर्चामुळे नामांतर चळवळीला जातीय रंग मिळाला. 
- याच दिवशी सायंकाळी विद्यार्थी कृति समितीने महाराष्ट्र शासनाची प्रेतयात्रा काढली. 

११) २२ जुलै १९७७- दलित पँथरचे नेते प्रीतमकुमार शेगावकर आणि गंगाघर गाडे यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. 

१२) २३ , व २४ जुलै १९७७- जनता मुस्लिम फोरमची औरंगाबादेत बैठक होऊन नामांतरास जाहिर पाठिंबा. या बैठकीला एसेम जोशी यांनी मार्गदर्शन केले. अकबर पटेल, उत्तमराव पाटील, निहाल अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. 

१३) २४ जुलै १९७७- उस्मानाबादेत नामांतर विरोधी विद्यार्थ्यांनी आंदोलन कले. 

१४) २४ जुलै १९७७- दलित पँथरची औरंगाबादेत बैठक व नामांतर लढा तिव्र करण्याचा निर्णय.

१५)२६ जुलै १९७७ - दलित पँथरचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा.

१६) ३० जुलै १९७७- मिलिंद महाविद्यालय परिसरातून शहरात मोर्चा. 

१७)२ आॅगस्ट १९७७-  दलित पँथरने मराठवाडाभर आंदोलनाचा निर्णय घेतला व नामांतर आंदोलनाची तिव्र लढाई सुरू झाली. आॅगस्ट मध्येच नामांतर विरोधी महाविद्यालयीन कृति समितीनेही आंदोलने सुरू केली व मराठवाडा जातीय द्वेषाने भडकू लागला. 

१८) २० ऑगस्ट १९७७- मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शहरात , प्रीतमकुमार शेगावकर यांनी सुभेदारीवर मोर्चा काढला. शेगावकर, बाबुराव कदम, दौलत खरात यांना  मुख्यमंत्र्यांचे २६ आॅगस्ट रोजी मुंबईत चर्चेचे निमंत्रण.

१९) ८ सप्टेंबर १९७७- मुंबईत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मराठवाड्याीतल सामाजिक कार्यकर्ते व दलित नेत्यांची बैठकीत. नामांतरावर एकमत. या बैठकीला गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा, गोविंदभाई श्रॉफ आदींची प्रमुख उपस्थिती .

२०) ११ सप्टेंबर १९७७: सरस्वती भुवन महाविद्यालयात नामांतर विरोधी महाविद्यालय विद्यार्थी कृति समितीची बैठक व १२ सप्टेंबर पासून बहिष्काराचे आंदोलनाचा इशारा. या कृति समितीचे संघटक मोहन देशमुख होते. त्यात अशोक फटांगडे, शिवाजी ढगे,सुरेश अवचार, प्रदीप जोगाईकर, विद्याधर पांडे, एकनाथ पाथ्रीकर हे होते. यांचे नेतृत्व अशोक देशमुख (परळी ) व राजा साळुंके (उस्मानाबाद ) यांनी केले. 

२१) १७ सप्टेंबर १९७७- मागासवर्गीय सुधार महासंघानेही बैठक घेऊन नामांतरास पाठिंबा दिला. 

२२) १९ सप्टेंबर १९७७- नामांतर विरोधकांचा मराठवाडा बंद, आंदोलने.

२३) २३ सप्टेंबर १९७७- मराठवाड्यातील जातीय तणाव निवळावा म्हणून काम करण्यासाठी प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक- विद्यार्थी कृति समितीची स्थापना. या समितीत प्रा. बापूराव जगताप, ज्येष्ठ पत्रकार, संपादक बाबा दळवी हे कार्याध्यक्ष  व सुभाष लोमटे हे संघटक होते.  तकी हसन, कवि फ.मुं. शिंदे, डी.एल. हिवराळे, प्रकाश वांगीकर, डॉ. शशी अहंकारी, प्रवीण वाघ यांचाही समावेश  होता. 

२४) २३ सप्टेंबर १९७७- दलित युवक आघाडीने मूक मोर्चा काढला. 
--याच पद्धतीनेपुढे मोर्चा व प्रतिमोर्चा असे मराठवाडाभर जिल्हे, तालुके, एवढेच नव्हे तर गावपातळीवरही आंदोलन व प्रतिआंदोलनाचे सत्र सुरू झाले आणि मराठवाड्यात दलित -सवर्ण संघर्षाच्या ठिणग्या झडू लागल्या. 

२५) २७ जुलै १९७८- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ’ असा नामांतराचा ठराव मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित झाला.

२६) ऑगस्ट १९७८- नामांतराचा ठराव पारित झाल्यानंतर मराठवाड्यात तब्बल ११ दिवस जातीय दंगल उसळली. त्यात दलितांना जीवंत जाळण्यासह घरेदारे पेटवून देण्यात आली. दलित महिलांवर अत्याचार झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी करण्यात आली. याचे पडसाद मराठवाड्याबाहेर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी  कमी जास्त स्वरूपात उमटले. 

२७) १९७८ ते १९९४ पर्यंत तब्बल १६ वर्ष महाराष्ट्रात ठिकठिकाणी नामांतरासाठी आंदोलने होत राहिली. मराठवाडा ही आंदोलनाची केंद्रभूमि होता. 

२८) १४जानेवारी १९९४ - मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामविस्तार ठराव पारित करून कठोरपणे अमंलबजावणी केली. 

Web Title: Namantar Andolan: Know, 'Namantar to Namavistara' day by day happenings...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app