रामदास पेठ हद्दीत दोन हत्यांनी शहर हादरले; रामनवमीच्या मिरवणुकीतील वाद उफाळला!

By आशीष गावंडे | Published: April 18, 2024 05:53 PM2024-04-18T17:53:02+5:302024-04-18T17:53:45+5:30

पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध

Two murders rock city in Ramdas Peth area; Controversy erupted in Ram Navami procession! | रामदास पेठ हद्दीत दोन हत्यांनी शहर हादरले; रामनवमीच्या मिरवणुकीतील वाद उफाळला!

रामदास पेठ हद्दीत दोन हत्यांनी शहर हादरले; रामनवमीच्या मिरवणुकीतील वाद उफाळला!

आशिष गावंडे, अकोला: शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात मध्यरात्री अतुल रामदास थोरात नामक युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत देशमुखफैल परिसरातील भवानीपेठ मध्ये राजू संजीव गायकवाड नामक अठरा वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना घडल्याने शहर पुन्हा एकदा दोन हत्यांनी हादरून गेले आहे.

रामदास पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशन चौकात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अतुल रामदास थोरात रा. अण्णाभाऊ साठे नगर, अकोटफैल या युवकाची जुन्या वैमनस्यातून हत्या घडल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात तरुणाने मृतक अतुलवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे अतुलचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. 

रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

देशमुखफैल भागातील भवानी पेठ मध्ये राहणाऱ्या राजू संजीव गायकवाड हा बुधवारी शहरात रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झाला होता. या शोभायात्रेत राजूचा देशमुखफैल परिसरातील काही युवकांशी वाद झाला होता; हे प्रकरण मित्रांच्या मदतीने तेथेच आपसात मिटविण्यात आले होते; परंतु, रात्री दोन वाजताच्या सुमारास राजू गायकवाडच्या घरी तीन अज्ञात इसम आले आणि त्यांनी राजूला घराबाहेर बोलावले.  राजू घराबाहेर आला असता आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. राजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य व परिसरातील नागरिक घराबाहेर आले असता, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.  गंभीर अवस्थेत असलेल्या राजूला कुटुंबीयांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

रामदास पेठ पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध

एकाच रात्रीत दोन हत्या झाल्याची गंभीर दखल घेत शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज बहुरे व फॉरेनसिक टीम घटनास्थळावर दाखल झाली होती. फरार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती रामदास पेठचे ठाणेदार मनोज बहूरे यांनी दिली.

Web Title: Two murders rock city in Ramdas Peth area; Controversy erupted in Ram Navami procession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.