‘जीएमसी’तील वसतिगृहात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:35 AM2019-10-01T10:35:51+5:302019-10-01T10:35:58+5:30
हीच संधी साधत काही लोकांकडून मुलींचा पाठलाग अन् अश्लील चाळे करण्यासारखे प्रकार घडत आहेत.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने विद्यार्थिनींना पाण्यासाठी रात्री वसतिगृहाबाहेर पडावे लागत आहे. हीच संधी साधत काही लोकांकडून मुलींचा पाठलाग अन् अश्लील चाळे करण्यासारखे प्रकार घडत आहेत. हा प्रकार येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घातक ठरत असून, याकडे महाविद्यालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबतच निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आहेत. या वसतिगृहात इतर समस्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांकडून स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करण्यात येत असली, तरी मुलींना पर्यायी व्यवस्था करणे परवडणारे नाही. म्हणूनच बहुतांश विद्यार्थिनी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास अपघात कक्षाजवळीत हायजीन वॉटर सेंटर येथे जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याच संधीचा लाभ घेत काही लोकांकडून या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन होत असल्याचे धक्कादायक प्रकारही घडले आहेत; परंतु बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनींकडून तक्रार केली जात नसल्याचे वास्तव आहे. दोन दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार अपघात कक्ष परिसरात विद्यार्थिनींसोबत घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाने अश्लील चाळे केल्यानंतरचा हा प्रकार असून, याकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षेत वाढ करणे सोईस्कर होईल.
सुरक्षेकडे दुर्लक्ष
विद्यार्थिनींना रात्रीच्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी वसतिगृहाबाहेर पडावे लागते. अपघात कक्ष ते वसतिगृहादरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गर्दी, तसेच रिक्षा चालकांचीही गर्दी असते. या दरम्यान विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रशासनाच्या मते वसतिगृहातील आरओ सुस्थितीत
वसतिगृहातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला विचारणा केली असता, येथील आरओ सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले; परंतु यातील काही आरओ नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.
वसतिगृहातील आराओ सुस्थितीत आहेत. ज्या ठिकाणी काही बिघाड झाले असतील, त्यांची दुरुस्ती दोन दिवसांत केली जाईल. शिवाय, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासही प्राधान्य देण्यात येत आहे.
- संजीव देशमुख, प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला