नगरकरांंना दिलासा : पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णाला लवकरच डिस्चार्ज; तीन अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:52 AM2020-03-26T11:52:22+5:302020-03-26T11:53:43+5:30
नगरकरांसाठी दिलासायदायक बातमी आहे. पहिल्या रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अंतिम २४ तासांचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे.
अहमदनगर : नगरकरांसाठी दिलासायदायक बातमी आहे. पहिल्या रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अंतिम २४ तासांचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे. या रुग्णाची प्रकृती पाहता हा अहवालही निगेटीव्ह येईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे यांनी दिली.
नगरमध्ये कोरानाबाधित तीन रुग्ण आढळून आहेत. या रुग्णांना बुथ हॉस्पीटल येथे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या तिन्ही रुग्णांची महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवारआणि आरोग्य अधिकारी डॉ़ बोरगे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर बोरगे यांनी वरील महिती दिली. बोरगे म्हणाले, नगरमधील तिन्ही कोरानाबाधित रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. पहिल्या रुग्णांची ७ आणि पुन्हा १४ दिवसांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. १४ दिवसांनंतर अंतिम चाचणी २४ तासानंतर करणे आवश्यक आहे. त्यानुसार पहिल्या रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास पहिल्या रुग्णाला घरी सोडण्यात येईल, असे बोरगे यांंनी सांगितले.
अन्य दोन रुग्णही ठणठणीत
अन्य दोन रुग्णांची प्रकृती देखील ठणठणीत आहे. तिस-या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आले? याचे सर्वेक्षण महापलिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांच्या स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल कसा येतो, त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे बोरगे यांनी सांगितले.