यवतमाळला पहिल्यांदाच चार मंत्री; विधानसभेला युतीचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 02:17 PM2019-06-16T14:17:59+5:302019-06-16T14:18:44+5:30

आतापर्यंत काँग्रेस व नंतर आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तिघांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता

Yavatmal's first four ministers; Attempts to increase the Legislative Assembly power | यवतमाळला पहिल्यांदाच चार मंत्री; विधानसभेला युतीचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न

यवतमाळला पहिल्यांदाच चार मंत्री; विधानसभेला युतीचे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न

Next

यवतमाळ : राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच जिल्ह्यातील चौघांचा समावेश झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळाली आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. 


आतापर्यंत काँग्रेस व नंतर आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तिघांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. त्यात मनोहरराव नाईक, अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके यांचा समावेश होता. अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात जिल्ह्याला सातत्याने दोन ते तीन मंत्रीपदे मिळत होती. मात्र, यावेळी भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा केवळ दोघांनाच राज्यमंत्रीपद मिळू शकले होते. त्यात भाजपचे मदन येरावार आणि शिवसेनेचे संजय राठोड यांचा समावेश होता. या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद सोपविले होते. मात्र दोघेही राज्यमंत्री होते. जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपदापासून वंचित रहावे लागले होते. 


मंत्रिमंडळाच्या विस्तारात युतीने राळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके आणि यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश केला. युतीच्या काळात पहिल्यांदाच जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद आता लाभले आहे. या दोन मंत्र्यांमुळे युतीच्या जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात जिल्ह्याला चार मंत्री लाभले आहे. यातून भाजप-शिवसेना युतीने जिल्ह्यावर आपली पकड आणखी घट्ट करण्याची व्यूहरचना आखल्याचे दिसून येत आहे. 


तब्बल सहा जण मंत्री, राज्यमंत्री 
या चार मंत्र्यांशिवाय दोघांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामजू पवार यांचा समावेश आहे. यामुळे युतीच्या कार्यकाळात जिल्ह्याला मंत्री व मंत्रीपदाचा दर्जा असलेले सहा चेहरे मिळाले आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात जिल्ह्याची ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. 


प्राचार्य डॉ. अशोक उईके
राळेगावचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक रामाजी उईके यांचा मंत्रिमंडळ विस्तारात थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यापूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रा.डॉ. उईके यांनी राळेगाव मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रा. पुरके यांना लढत दिली होती. मात्र दोनदा त्यांना अपयश आले. तथापि त्यांनी तिसºयांदा भाजपच्या उमेदवारीवर प्रा. पुरके यांचा पराभव केला. दरम्यान प्रा.डॉ.उईके हे बुलडाणा जिल्ह्यात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी गेली १५ वर्ष सातत्याने राळेगाव विधानसभा मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला होता. 

प्रा.डॉ. तानाजी सावंत
उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण व साखर सम्राट म्हणून ओळख असलेले प्रा.डॉ. तानाजी सावंत यांना शिवसेनेने २०१६ मध्ये प्रथमच यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली. या संधीचा पुरेपूर लाभ घेत प्रा.डॉ. सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांचा पराभव करून विधान परिषद गाठली. अवघ्या दोन वर्षातच शिवसेनेने त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली. तत्पूर्वी त्यांची शिवसेनेचे उपनेते म्हणून निवड झाली होती. त्याच प्रमाणे शिवसेनेचे उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. शिव जलक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात पाणी वाचविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. या उपाययोजनांनी प्रभावित होऊनच शिवसेनेने त्यांना प्रथम आमदार व आता मंत्रिपदाची संधी दिल्याचे सांगितले जाते.

Web Title: Yavatmal's first four ministers; Attempts to increase the Legislative Assembly power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.