७०० किमी पायपीट करून आलेल्या तरुणांना यवतमाळ जिल्ह्यात गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:54 PM2020-04-04T18:54:43+5:302020-04-04T18:56:40+5:30

७०० किमीचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले.

Villagers in Yavatmal district stops two youths who have crossed 700 km | ७०० किमी पायपीट करून आलेल्या तरुणांना यवतमाळ जिल्ह्यात गावबंदी

७०० किमी पायपीट करून आलेल्या तरुणांना यवतमाळ जिल्ह्यात गावबंदी

Next
ठळक मुद्देगुजरात ते दारव्हा खडतर प्रवास गावाबाहेर जंगलातील मंदिरात मुक्कामआता १४ दिवस शाळेतच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूच्या संकटाने देशभरात लॉकडाऊन होताच अनेक मजुरांची तारांबळ उडाली. घरापासून दूर अडकलेल्या मजुरांनी घरी पोहोचण्यासाठी वाट्टेल ती जोखीम पत्करली. असाच ७०० किमीचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. तर आता पुढचे १४ दिवस शाळेत क्वारंटाईन होऊन राहावे लागणार आहे.
दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. सुरेश रामकृष्ण रामपुरे (२५) आणि विशाल देवीदास मडावी (१८) अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही रोजगारासाठी गुजरातमध्ये गेले होते. सुरत जिल्ह्यातील नवागाव दिंडोली येथे ते एका रसवंतीमध्ये काम करायचे. मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आणि रसवंतीचा रोजगार थांबला. आता रोजगारही नाही अन् आश्रयही नाही, म्हणून या दोघांनीही गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. पण येणार कसे? सगळीकडे वाहतूक बंद. राज्याचीच काय, जिल्ह्याचीही सीमा ओलांडण्यावर बंदी. शेवटी त्यांनी गुजरात ते दारव्हा प्रवास पायीच करण्याचे ठरविले आणि ३१ मार्चच्या रात्री निघाले.
नवागाव दिंडोळी ते कोरदोडा हे ७० किलोमीटरचे अंतर पायी चालत आल्यावर त्यांना गुजरात पोलिसांनी पकडले. धाकदपटशा करीत पोलीस वाहनातून उचलगावपर्यंत आणून सोडले. हे गाव गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे. इथून पुढे रस्त्याने गेले तर पोलीस पुन्हा अडवतील म्हणून हे दोन्ही तरुण चक्क शेत, जंगल अशा मागार्ने वाटचाल करू लागले. मजल दरमजल करीत ते नंदूरबारपर्यंत पोहोचले. तेथे एक टेम्पो मिळाला. त्यातून ते जळगावात आले. पुन्हा दुसरे वाहन पकडून धुळ्यात आले. मग पायी चालत मूर्तिजापूर-बडनेरा-नेर असा प्रवास करीत आले. अन् शेवटी ४ एप्रिलच्या मध्यरात्री ते दारव्हा तालुक्यातील चिकणी या आपल्या मूळगावात दाखल झाले.
येण्यापूर्वी त्यांनी नातेवाईकांना फोन केला. मात्र नातेवाईकांनी कोरोनाची परिस्थिती पाहून नातेवाईक व गावकऱ्यांनी ताठर भूमिका घेत त्यांना गावाबाहेरच थांबविले. रात्रभर गावाबाहेरच्या हनुमान मंदिरात थांबवून सकाळीच दारव्हा येथे उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने गावात परत आणले गेले. मात्र अजूनही दक्षता म्हणून १४ दिवस त्यांना घराऐवजी गावातील शाळेत ठेवले जाणार आहे. तलाठी, पोलीस पाटील आदींच्या हजेरीत त्यांची व्यवस्था करण्यात आली.

Web Title: Villagers in Yavatmal district stops two youths who have crossed 700 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.