UPSC Result: यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या तिघांचा झेंडा, दर्शन दुगडला १३८ तर बंकेश पवार ५१६, स्नेहल ढोकेला ५६४ वी रॅंक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:20 PM2021-09-24T22:20:49+5:302021-09-24T22:22:56+5:30

UPSC Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकविला आहे.

UPSC Result: Three flags of Yavatmal in UPSC exam, Darshan Dugad 138, Bankesh Pawar 516, Snehal Dhoke 564th rank | UPSC Result: यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या तिघांचा झेंडा, दर्शन दुगडला १३८ तर बंकेश पवार ५१६, स्नेहल ढोकेला ५६४ वी रॅंक

UPSC Result: यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या तिघांचा झेंडा, दर्शन दुगडला १३८ तर बंकेश पवार ५१६, स्नेहल ढोकेला ५६४ वी रॅंक

Next

यवतमाळ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील तिघांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. आर्णी येथील दर्शन दुगडने १३८ वी रॅंक मिळविली तर दिग्रसच्या बंकेश पवारला ५१६ आणि यवतमाळच्या स्नेहल ढोकेला ५६४ वी रॅंक मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत मागे नाही हेच या तिघांच्या यशाने पुन्हा एकदा अधाेरेखीत झाले आहे.

दर्शन प्रकाशचंद दुगड हा आर्णी येथील रहिवासी असून त्याचे वडील आसरा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर आई संतोषी गृहिणी आहे. त्याने अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविली. त्यानंतर दोन वर्षे हैदराबाद आणि मुंबईच्या खासगी कंपनीत नोकरीही केली. मात्र केंद्रीय लोकसेवा आयाेगाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी ही इच्छा त्याला अस्वस्थ करीत होती. त्यातूनच २०१८ मध्ये दर्शनने खासगी नोकरी सोडून यूपीएससीची तयारी सुरू केली. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.

दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी येथील बंकेश बाबाराव पवार ५१६ व्या रॅंकने यशस्वी झाला. बंकेशचे वडील वनविभागातून निवृत्त झाले आहे. तर आई गृहिणी आहे. पोलीस सेवेमध्ये करिअर करण्याचा मनोदय बंकेशने व्यक्त केला आहे. त्याने दिल्ली येथे अभ्यास पूर्ण केला. यासोबतच मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी मिळविलेली आहे. पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टीट्युट येथे त्याचे शिक्षण झालेले आहे.

यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात राहणारे शेतकरी वसंतराव ढोके यांची मुलगी मीना ढोके यांनीही यूपीएससीच्या परीक्षेत ५६४ वी रॅंक मिळविली. त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरींमध्ये पदवी घेतली असून २०१४ मध्येच एमपीएससी उत्तीर्ण करून नागपूर येथे सध्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. त्यांची आई मीना ढोके गृहिणी असून पती अविनाश भगत यवतमाळ येथे शैक्षणिक संस्था चालवितात.
कोट

दर्शन म्हणतो, सातत्य हेच यशाचे गुपित
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर मी अपयशाची कारणे शोधली. नेमका कुठे कमी पडलो हे लक्षात घेऊन अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार केली. समविचारी मित्रांचा ग्रुप करून अभ्यास सुरू केला. त्याचा खूप फायदा झाला. सराव आणि सातत्य या गोष्टींमुळे यश सुकर झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घोकंपट्टी न करता विषय समजून स्वत: चिंतन करावे.
- दर्शन प्रकाशचंद दुगड, आर्णी
 

लहानपणापासून प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय होते. त्यामुळेच अभियंता म्हणून नोकरी न करता स्पर्धा परीक्षांची तयारी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पदवी झाल्याबराेबर सेल्फ स्टडीवर भर द्यावा.
- स्नेहल वसंतराव ढोके, यवतमाळ

 
प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास पूर्वीपासून मनी ठेवला होता. जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याने यशाचा खडतर प्रवास पूर्ण करता आला आहे. पोलीस सेवेमध्ये पुढील काळात नोकरी करण्याचे ध्येय आहे. यशामध्ये आई-वडिलांसह कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे.
- बंकेश बाबाराव पवार

Web Title: UPSC Result: Three flags of Yavatmal in UPSC exam, Darshan Dugad 138, Bankesh Pawar 516, Snehal Dhoke 564th rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.