उमरखेड तालुका बनला कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:07+5:30

तालुक्यातील तलाठी, पंचायत समितीचा शिपाई व भाजपाचा एक कार्यकर्ता पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमदारांनी खबरदारी म्हणून रविवारी आपले स्वॅब तपासणीला दिले. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १२७ झाली. त्यापैकी ८२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. ४२ जणांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

Umarkhed taluka became a hotspot for corona virus | उमरखेड तालुका बनला कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट

उमरखेड तालुका बनला कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी २५ रुग्ण : शहरासह ढाणकी, विडूळलाही झटका, नागरिक, पदाधिकाऱ्यांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पांढरकवडा आणि पुसदमध्ये सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आता उमरखेड तालुका कारोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे दिसून येत आहे. रविवारी तब्बल २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सुरुवातीच्या तीन महिन्यात उमरखेड शहर व तालुक्यात कोरोनाचे नाममात्र रुग्ण होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जावून आलेल्या धानोरा (साचलदेव) येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. शहरातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांलाही लागण झाली होती. त्यांचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तुरळक प्रमाणात नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट सुरू झाला आहे. शनिवारी तब्बल २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रविवारी आणखी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात उमरखेड शहरातील १८, ढाणकी येथील सहा आणि विडूळ येथील एका नागरिकाचा समावेश आहे.
शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यापूर्वी शहर व ढाणकी येथील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला होता. तरीही कोरोनाची साखळी तोडण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. तालुक्यातील मरसूळ येथील कोविड सेंटरमध्ये दररोज नागरिकांची तपासणी केली जात आहे. पंचायत समितीमधील दोन कर्मचारी व एका पदाधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंचायत समिती कार्यालय सील करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा चक्रावली आहे.

ग्रामसेवक, रोजगार सेवकांची तपासणी
पंचायत कर्मचारी व पदाधिकारी पॉझिटिव्ह आल्याने आता तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व रोजगार सेवकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय पंचायत समिती प्रशासनाने घेतला आहे. पंचायत समितीत विविध बैठकांच्या निमित्ताने तालुक्यातील ग्रामसेवक, रोजगार सेवक येत असतात. त्यामुळे त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊनच तातडीने ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदारांनी दिला स्वॅब
तालुक्यातील तलाठी, पंचायत समितीचा शिपाई व भाजपाचा एक कार्यकर्ता पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आमदारांनी खबरदारी म्हणून रविवारी आपले स्वॅब तपासणीला दिले. तालुक्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १२७ झाली. त्यापैकी ८२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. ४२ जणांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत पाच जणांचे बळी गेले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. प्रशासन उपाययोजनांत व्यस्त आहे.

Web Title: Umarkhed taluka became a hotspot for corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.