सोशल मीडियावरील मजकुरात अनिल परब यांच्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:21 PM2021-07-28T16:21:11+5:302021-07-28T16:21:35+5:30

यवतमाळातील कारवाई

An ST employee from Yavatmal has been suspended for criticizing Minister Anil Parab and the government | सोशल मीडियावरील मजकुरात अनिल परब यांच्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचारी निलंबित

सोशल मीडियावरील मजकुरात अनिल परब यांच्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचारी निलंबित

Next

यवतमाळ : परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारची बदनामी केल्याचा ठपका ठेवत एसटी वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक निरीक्षकाने सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ देत आगार व्यवस्थापकांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. प्रवीण ज्ञानेश्वर लढी, असे निलंबन झालेल्या वाहकाचे नाव आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या खासगी व्हॉट्सॲप ग्रुपवर यवतमाळ आगारातील वाहक प्रवीण लढी यांनी मंत्री आणि सरकारविषयी काही मजकूर टाकला होता. याविषयी पोलीस आणि एसटी महामंडळाकडे तक्रार झाली. पोलिसांनी ही तक्रार एनसी (अदखलपात्र) ठरविली, तर एसटी महामंडळाने सखोल चौकशी केली. यवतमाळ आगाराचे वाहतूक निरीक्षक एस.एस. राठोड यांनी या संदर्भातील अहवाल सादर केला.

परिवहनमंत्री अनिल परब आणि आघाडी सरकारची बदनामी हाेईल, असा मजकूर प्रसारित करण्यात आला. शिवाय, तपासणी कामात प्रवीण लढी हे सहकार्य करीत नसल्याचा अहवाल राठोड यांनी दिला. हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचेही विशेषत्वाने नमूद करण्यात आले.

याच अहवालाच्या आधारे प्रवीण लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यवतमाळ आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) यांनी हा आदेश काढला आहे. चौकशी कामात व्यत्यय येऊ नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे. निलंबन कालावधीत लढी यांना दररोज सकाळी १० वाजता यवतमाळ आगार प्रमुखांकडे हजेरी लावायची आहे.

असा होता मजूकर

'आपण महाराष्ट्राची महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सिजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. १०० कोटी वसुली सरकार' असा मजकूर प्रवीण लढी यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केला, असे वाहतूक निरीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे.

विभाग नियंत्रक अनभिज्ञ

वाहक प्रवीण लढी यांच्यावर निलंबन कारवाई संदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने एसटीचे यवतमाळ विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांनी आपल्याला या कारवाईविषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. चौकशी करून सांगतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

एसटीच्या इतिहासातील पहिलीच कारवाई

महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री आणि सरकारची बदनामी केली, अशा कारणावरून कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची एसटीच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, लढी यांच्या निलंबन प्रकरणात काही एसटी कर्मचारी संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याची माहिती आहे.

Web Title: An ST employee from Yavatmal has been suspended for criticizing Minister Anil Parab and the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.