354 जणांना पकडून ऑन द स्पाॅट कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:00 AM2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:11+5:30

वारंवार आवाहन करूनही नागरिक ऐकत नाही. अखेर शुक्रवारी पोलीस प्रशासन आणि महसूल यंत्रणेने रस्त्यावर उतरुन कारवाई सुरू केली. बसस्थानक चौक, आर्णी नाका, स्टेट बॅंक चौक अशा महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचे मनुष्यबळ वाढविण्यात आले. सकाळपासूनच प्रत्येक वाहन अडवून तपासणी सुरू करण्यात आली. अनेकांनी  मी दूध घ्यायला, भाजी घ्यायला आलो अशी बतावणी करण्याचा प्रयत्न केला.

On-the-spot corona test capturing 354 people | 354 जणांना पकडून ऑन द स्पाॅट कोरोना चाचणी

354 जणांना पकडून ऑन द स्पाॅट कोरोना चाचणी

googlenewsNext
ठळक मुद्देबिनकामाचा फिरतो अन्‌ तपासणीला घाबरतो !

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रेमाने समजावून सांगितल्यावरही ऐकायचेच नाही, हा शिरस्ता यवतमाळकर गेल्या महिनाभरापासून सोडायला तयार नाही. कोरोना घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्यावरही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहे. अखेर प्रेमाचे आवाहन सोडून प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासूनच नियमाचा दंडुका उगारला. चौकाचौकात नागरिकांना अडवून खडसावले, दंड वसूल केला आणि वेळप्रसंगी ऑन द स्पाॅट कोरोना चाचणीही करवून घेतली. 
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १५ मेपर्यंत कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या मोजक्या दुकानांना सकाळी ११ वाजतापर्यंत मुभा आहे. मात्र त्याचाच गैरफायदा घेत बाजारात बेफाम फिरणाऱ्यांची आणि वेळ मोडून दुकान सुरू ठेवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी रुग्णालयांमध्ये पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. 
वारंवार आवाहन करूनही नागरिक ऐकत नाही. अखेर शुक्रवारी पोलीस प्रशासन आणि महसूल यंत्रणेने रस्त्यावर उतरुन कारवाई सुरू केली. बसस्थानक चौक, आर्णी नाका, स्टेट बॅंक चौक अशा महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचे मनुष्यबळ वाढविण्यात आले. सकाळपासूनच प्रत्येक वाहन अडवून तपासणी सुरू करण्यात आली. अनेकांनी  मी दूध घ्यायला, भाजी घ्यायला आलो अशी बतावणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडताना मास्क का घातला नाही याचे उत्तर अनेक जण देऊ शकले नाही. अशा विनाकारण भटकणाऱ्यांना पोलीस आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांनी लगेच बाजूला घेतले आणि जागच्या जागी आरोग्य यंत्रणेमार्फत त्यांची कोरोना चाचणी करवून घेण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात अशा जवळपास ३५४ नागरिकांचे स्वॅब घेतल्याची माहिती  प्रशासनाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी शहरात अशाच पद्धतीचा  ‘ड्राईव्ह’ राबविण्यात आला. त्यावेळी एकट्या दत्त चौकात एकाच दिवसात तब्बल ४० जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते. गर्दी टाळून कोरोना नियंत्रणासाठी शुक्रवारी प्रशासन रस्त्यावर उतरले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर,  तहसीलदार कुणाल झाल्टे, ठाणेदार मनोज केदारे, तालुका आरोग्य अधिकारी सुषमा खोडवे आदी उपस्थित होते. 
 

अर्धे शटर उघडून, मागच्या दाराने दुकानदारी चालविणाऱ्यांना दणका 

 सर्वसामान्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही अनेक जण अर्धे शटर उघडून दुकानदारी करीत आहे. तर काही दुकानदार मागच्या दाराने ग्राहकांना बोलावून वस्तूंची विक्री करीत आहे. हा प्रकार मोडून काढण्यासाठी शुक्रवारी प्रशासनाने थेट दुकाने गाठून दंड ठोठावला. यात अनेक ठिकाणी हमरीतुमरीचे प्रसंगही उद्‌भवले. यवतमाळ मेनलाईन स्थित एका प्रतिष्ठीत माॅलमध्ये शिरुन प्रशासनाने ४३ हजारांचा दंड ठोठावला. तर धामणगाव रोड व आर्णी मार्गावरील अन्य काही दुकानांनाही दंड ठोठावण्यात आला. यावेळी गर्दी करणाऱ्या नागरिकांनाही पोलिसांनी ‘कृपया सहकार्य करा, आम्हाला आमचे काम करू द्या’ अशा समजावणीच्या सुरातच पांगविले. 
 

दीडशे कोरोनाग्रस्त फिरत होते खुलेआम 
प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन द स्पाॅट कोरोना चाचणी सुरु केली आहे. आतापर्यंत दीड हजार लोकांची अशी चाचणी आटोपली. त्यातील १० टक्के म्हणजे जवळपास दीडशे लोक कोरोना पाॅझिटिव्ह आल्याचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सांगितले. शुक्रवारी स्टेट बॅंक चौकात २०२ तर आर्णी नाका परिसरात १५२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. या ३५४ जणांपैकी आठ जण पाॅझिटिव्ह आले. 

 

Web Title: On-the-spot corona test capturing 354 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.