यवतमाळ विधान परिषदेसाठी चार अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 03:40 PM2020-01-17T15:40:10+5:302020-01-17T15:41:40+5:30

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आता सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Six candidates, including four independents, are in the fray for Yavatmal Legislative Council | यवतमाळ विधान परिषदेसाठी चार अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात

यवतमाळ विधान परिषदेसाठी चार अपक्षांसह सहा उमेदवार रिंगणात

Next
ठळक मुद्देसात उमेदवारांची माघार एकाचा अर्ज छाननीत बाद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ३१ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतली. तर एकाने गुरुवारीच आपले नामांकन मागे घेतले होते. एकाचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यामुळे आता सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यात चार अपक्षांचा समावेश आहे.
आता निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, भाजपचे सुमित बाजोरिया, अपक्ष शंकर बडे, संजय देरकर, बाळासाहेब मुनगीनवार व दीपक निलावार यांचा समावेश आहे.
शुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये जावेद पहेलवान, जावेद अन्सारी, आरिफ सुरैय्या, नंदकिशोर अग्रवाल, जगदीश वाधवाणी व राजू दुधे यांचा समावेश आहे. नूर मोहंमद खान यांनी गुरुवारीच नामांकन मागे घेतले होते. तर सतीश भोयर यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता.
यवतमाळ विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अनपेक्षितरीत्या मोठ्या संख्येने नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात पक्षाच्या उमेदवारांशिवाय अपक्षांची संख्या मोठी आहे. या अपक्षांना रोखण्यासाठी प्रमुख उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न झाले. त्यात काही अंशी यशही आले. परंतु चौघांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर रिंगणातील सर्व अपक्षांचा संयुक्तपणे स्वतंत्र तिसरा उमेदवार देता येतो का यासाठी गुरुवारी रात्री अपक्षांची बैठकही झाली. मात्र त्यात कुण्या एकाच्या नावावर एकमत झाले नाही. त्या अपक्षांपैकी चौघांची उमेदवारी कायम आहे. त्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष यांचाही समावेश आहे. जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक असताना उमेदवाराची बाहेरुन आयात कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत सेनेच्या माजी आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असला तरी काँग्रेस व राष्टÑवादीचा त्याला पाठिंबा असल्याने तो महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार ठरला आहे. चार अपक्षांची कायम असलेली दावेदारी भाजप व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची व त्यांच्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अखेरपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Six candidates, including four independents, are in the fray for Yavatmal Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.