पांढरकवडा तालुक्यात राजकीय वातावरण तापले, सभापतींवरही अविश्वास ठराव : कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघासह आता पंचायत समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:26+5:302021-07-26T04:38:26+5:30

पांढरकवडा तालुक्यात काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे व भाजपचे नेते अण्णासाहेब पारवेकर यांचे परस्परविरोधी गट कार्यरत आहेत. हे दोन्ही ...

Political atmosphere heats up in Pandharkavada taluka, no-confidence motion against the chairpersons: Agricultural Produce Market Committee, now Panchayat Samiti with purchase and sale team | पांढरकवडा तालुक्यात राजकीय वातावरण तापले, सभापतींवरही अविश्वास ठराव : कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघासह आता पंचायत समिती

पांढरकवडा तालुक्यात राजकीय वातावरण तापले, सभापतींवरही अविश्वास ठराव : कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघासह आता पंचायत समिती

Next

पांढरकवडा तालुक्यात काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे व भाजपचे नेते अण्णासाहेब पारवेकर यांचे परस्परविरोधी गट कार्यरत आहेत. हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. या दोन्ही गटात यापूर्वी अनेकदा समझोतासुद्धा झाला आहे; परंतु या दोन गटांतील विरोधाची ठिणगी गेल्या २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत पडली. शिवाजीराव मोघे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पारवेकर गट व शिवसेना यांच्यात युती करून कृषी उत्पन्न बाजार समितीने निवडणूक लढविली होती. या युतीने भरघोस यशसुद्धा मिळविले. सभापती पारवेकर गटाचा, तर उपसभापती मोघे गटाचा विराजमान झाला. त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या; परंतु ठरल्याप्रमाणे पारवेकर गटाने या निवडणुकीत शिवाजीराव मोघे यांना सहकार्य केले नाही. तेव्हापासूनच मोघे व पारवेकर गटात वितुष्ट आले. पारवेकर गटाचे बाजार समितीचे सभापती असलेले जान महम्मद जीवनी यांच्यावर मोघे गटाने अविश्वास ठराव आणला व त्यांना पायउतार केले. काही दिवस होत नाही तोच पारवेकर गटाने मोघे गटाचे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला व त्यांना पायउतार केले. त्यानंतर मोघे गटाने पारवेकर गटावर पुन्हा कुरघोडी केली. पायउतार झालेले जितेंद्रसिंग कोंघारेकर यांनी सहायक निबंधकांकडे खविसंच्या विद्यमान नऊ संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली. खविसंच्या उपविधीतील तरतूद क्रमांक ४२ (ग) (१) नुसार विद्यमान संचालकांनी तरतुदींचे पालन केले नाही. त्यामुळे हे संचालक अपात्र ठरतात. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी तक्रार होती. सहायक निबंधकांनी या प्रकरणावर सुनावणी घेऊन संस्थेचे नऊ संचालक अपात्र ठरविण्यात आल्याचा निर्णय दिला व संस्थेवर तत्काळ प्रशासक नेमला.

बॉक्स : २७ जुलैला होणाऱ्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष

शिवसेनेचे विद्यमान पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम यांच्यावर ८ पैकी ६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यापैकी बहुसंख्य सदस्य हे पारवेकर गटाचे आहेत. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी येत्या २७ तारखेला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विशेष सभेत पंकज तोडसाम यांच्यावर अविश्वास ठराव पारित होतो की काय, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Political atmosphere heats up in Pandharkavada taluka, no-confidence motion against the chairpersons: Agricultural Produce Market Committee, now Panchayat Samiti with purchase and sale team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.