यवतमाळातून  ई-वाहतूक पासच नव्हे, तर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रही मिळते बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:15 PM2021-05-13T22:15:35+5:302021-05-13T22:17:11+5:30

Yawatmal news आंतरजिल्हा प्रवासासाठी यवतमाळातून बोगस ई-वाहतूक पास बनविले जात असल्याचा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला. त्याची दखल घेऊन सायबर गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवित यातील म्होरक्यास बेड्या घातल्या.

Not only e-transport pass but also covid negative certificate is bogus from Yavatmal | यवतमाळातून  ई-वाहतूक पासच नव्हे, तर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रही मिळते बोगस

यवतमाळातून  ई-वाहतूक पासच नव्हे, तर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्रही मिळते बोगस

Next
ठळक मुद्देसायबर गुन्हे शाखेच्या धाडीत निष्पन्न सूत्रधार गजाआड, गोधनी रोडवरून चालायचा गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : आंतरजिल्हा प्रवासासाठी यवतमाळातून बोगस ई-वाहतूक पास बनविले जात असल्याचा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आला. त्याची दखल घेऊन सायबर गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवित यातील म्होरक्यास बेड्या घातल्या. तेव्हा ई-पासच नव्हे, तर कोरोनाचा बोगस निगेटिव्ह रिपोर्टही या पाससाठी बनविला जात असल्याचा प्रकार पुढे आला.

प्रतीक सुभाष भड (रा. पजगाडे ले-आऊट, अरुणोदय सोसायटी, यवतमाळ) असे यातील सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे गोधनी रोडवरील स्वस्तिक चौकात ‘आयकूल सायबर कॅफे’ आहे. तेथील कॉम्प्युटर व प्रिंटरचा वापर करून तो बोगस ई-पास व निगेटिव्ह प्रमाणपत्र ३०० ते ५०० रुपयांत गरजवंतांना विकण्याचा गोरखधंदा करीत होता. सायबर गुन्हे शाखेने प्रतीक भड याच्या घराची झडती घेतली असता, कोविड-२०१९ चे बनावट निगेटिव्ह प्रमाणपत्र, बनावट ई-पास, ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एवढेच नव्हे, तर त्याच्या घरातून ३३ हजार २४० रुपये किमतीची अवैध विदेशी दारूही जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत ७८ हजार ८४० एवढी आहे.

यावरून आरोपी प्रतीक हा देशी दारूची तस्करीही करीत असल्याचे स्पष्ट होते. आरोपी प्रतीक विरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी भादंवि कलम ४६५, ४६६, ४६८, ४७१, ४७६, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) व दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. बोगस ई-पास व निगेटिव्ह प्रमाणपत्र बनविण्याच्या या रॅकेटमध्ये प्रतीकसोबत आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहे. यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून जारी होणाऱ्या कोविड-१९ प्रमाणपत्राच्या अगदी हुबेहुब बोगस निगेटिव्ह प्रमाणपत्र बनविले जात होते. ई-पासच्या पीडीएफमध्येही एडिटिंग करून पाहिजे त्या ठिकाणाचे पास बनवून दिले जात होते. ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमुळे यवतमाळातील हा गोरखधंदा उघड झाला.


जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर अधीक्षक के. ए. धारणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, एपीआय अमोल पुरी यांनी ही कारवाई केली. त्यामध्ये कविश पाळेकर, विशाल भगत, उमेश पिसाळकर, नीलेश राठोड, अजय निंबाळकर, महिला पोलीस शिपाई रोशनी जोगळेकर आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Not only e-transport pass but also covid negative certificate is bogus from Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.