‘एसटी’ चालकांच्या परवाना नूतनीकरणाची नवी ‘दुकानदारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 03:47 PM2019-09-11T15:47:42+5:302019-09-11T15:48:11+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सुमारे ३५ ते ४० हजार चालक आहेत. या सर्वांना प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असल्याने प्रमाणपत्र विकणाऱ्यांची चांदी होत आहे.

New source of income by ST drivers' license renewal | ‘एसटी’ चालकांच्या परवाना नूतनीकरणाची नवी ‘दुकानदारी’

‘एसटी’ चालकांच्या परवाना नूतनीकरणाची नवी ‘दुकानदारी’

googlenewsNext
ठळक मुद्दे२० वर्षांपूर्वीच्या प्रशिक्षण केंद्राचा शोध

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परवाना नूतनीकरणासाठी ‘एसटी’ चालकांना प्रशिक्षण प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली. हिच संधी हेरून काही लोकांनी ‘दुकानदारी’ सुरू केली आहे. पंधराशे ते दोन हजार रुपयात प्रमाणपत्राची विक्री केली जात आहे. याचा भुर्दंड चालकांना बसत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केलेली ही सक्ती दलालांसाठी कमाईचा चांगला स्रोत झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय चालकाची नोकरीच मिळत नाही. हे सर्व सोपस्कार २५ ते ३० वर्षांपूर्वीच झाले आहे. चालक प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र त्यांनी त्याचवेळी सादर केले. एसटीच्या स्टेअरिंगवर बसण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आलेला आहे. तीन वर्षांतून एकदा चालक परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. ही एक प्रक्रिया आहे. मात्र सेवेत रुजू झाले तेव्हा सादर केलेल्या चालक प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र आता नूतनीकरणासाठी मागितले जात आहे. यावर्षीपासूनच ही प्रथा सुरू करण्यात आली आहे.
यापूर्वी परवाना तपासणी, वैद्यकीय चाचणी आदी बाबी तपासून १५ दिवसात परवान्याचे नूतनीकरण करून मिळत होते. आता मात्र चालकांना प्रशिक्षण केंद्राचा शोध घ्यावा लागत आहे. काही प्रशिक्षण केंद्राचा ठावठिकाणाही नाही. अशावेळी त्यांना शोधण्याचे आव्हान चालकांपुढे आहे. हीच संधी दलाल मंडळींनी शोधली आहे. परवाना नूतनीकरणासाठी आलेल्या चालकांना जागीच प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते. महामंडळात सुमारे ३५ ते ४० हजार चालक आहेत. या सर्वांना प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असल्याने प्रमाणपत्र विकणाऱ्यांची चांदी होत आहे.
आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच दुकानदारी थाटलेल्या काही लोकांकडून अशा प्रकारचे प्रमाणपत्र विकण्यात येत आहे. यासाठी प्रती प्रमाणपत्र एक हजार ५०० ते दोन हजार रुपये घेतले जात आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्राची आरटीओने सक्ती जाहीर करताच कामगारांनी आर्थिक लूट होण्याची भीती व्यक्त केली होती. कामगार संघटनेने महामंडळाच्या अध्यक्षांना तसे पत्र दिले होते. यावर काहीच कारवाई झाली नाही. आता कामगारांनी व्यक्त केलेली ही भीती खरी ठरत आहे. त्यांना अडचणींना तोंड देण्यासोबतच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

‘एसटी’ प्रशिक्षण केंद्राचा पर्याय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चालक प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे नूतनीकरण करावे, असा पर्याय सूचविण्यात आलेला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यादृष्टीने विचार करावा, असे कामगारांना अपेक्षित आहे. कामगार संघटनेने परिवहनमंत्री तथा महामंडळ अध्यक्षांना निवेदन दिले आहे.

Web Title: New source of income by ST drivers' license renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.