कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाऱ्या शक्तिस्थळाला नवी झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:02+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ शक्तिस्थळ साकारण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर १९९७ ला बाबूजींचे निर्वाण झाले.

A new look at the powerhouse that gives energy to the workers | कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाऱ्या शक्तिस्थळाला नवी झळाळी

कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाऱ्या शक्तिस्थळाला नवी झळाळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बाबूजींनी आकाशाची उंची गाठल्यावरही जमिनीवरच्या आपल्या कार्यकर्त्यांचे कधीही विस्मरण होऊ दिले नाही. अन् त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही बाबूजींचे कार्य चिरस्मरणीय करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यातूनच यवतमाळमध्ये आगळेवेगळे ‘शक्तिस्थळ’ उभे राहिले. या स्मृतिस्थळाचे उद्घाटन २० वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी केले होते, तर आता २० वर्षांनंतर कार्यकर्त्यांनी शक्तिस्थळाचे सौंदर्यीकरण करून त्याला आणखी  देखणे केले. नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन या स्थळाचे व त्यामागील कार्यकर्त्यांच्या धडपडीचे कौतुक केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ शक्तिस्थळ साकारण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर १९९७ ला बाबूजींचे निर्वाण झाले. त्यांच्या तालमीत वाढलेला अगदी सामान्य घरातला कार्यकर्ता मनोज रायचुरा यांनी हे शक्तिस्थळ साकारण्यासाठी पुढाकार घेतला.  या शक्तिस्थळाचे २९ ऑगस्ट २००१ रोजी महानायक अमिताभ बच्चन, जया भादुरी, तत्कालीन खासदार अमरसिंग, लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन तत्कालीन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. 
गेल्या २० वर्षांपासून हे शक्तिस्थळ बाबूजींच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण यवतमाळकरांसाठी प्रेरक ठिकाण ठरले आहे. येथे दरवर्षी इंदिरा गांधी तसेच बाबूजींची जयंती-पुण्यतिथी हे निमित्त साधून कार्यकर्ते एकत्रित येतात.  बाबूजींपुढे नतमस्तक होतात. शिवाय मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे कोणतेही आंदोलन असो त्या आंदोलनाची सुरुवात याच शक्तिस्थळापासून होते.  
हे शक्तिस्थळ घडविणारे मनोज रायचुरा यांनी नुकतेच त्याचे सौंदर्यीकरण आणखी देखणे केले आहे. येथे नवीन प्लास्टरिंग करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. आजूबाजूचा परिसरही सुशोभित करण्यात आला आहे. त्यासाठी  जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर यांचे सहकार्य लाभल्याचे रायचुरा म्हणाले. 

दोन दशकापासून  स्मारक देतेय प्रेरणा 
- शक्तिस्थळ म्हणून नावारूपास आलेले बाबूजींचे हे स्मारक अत्यंत वेगळे आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा या दोघांच्याही भव्य भावमुद्रा येथे चितारण्यात आल्या आहेत. तळाशी संसद भवनाची प्रतिकृती, त्यावर दोन तळहात, मागे हिमालयाची प्रतिकृती त्यासोबत ‘भारत माता तेरी सेवा में ये दो जवाहर समर्पित’ असे घोषवाक्य साकारले आहे. २० वर्षांपासून यवतमाळातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देणारे हे स्मृतिस्थळ येणाऱ्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायक ठरणार आहे.   

 

Web Title: A new look at the powerhouse that gives energy to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.