Manoj Kedare - Independent Cell of Community Policing | कम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे

कम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे

ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीवर ठरू शकते प्रभावी

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने भारतातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांची सिंगापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सिंगापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तुलनात्मक पद्धतीने उहापोह केला.
भारत आणि सिंगापूरच्या कायद्यात काही फरक आहे का?
भारतातीलच कायदे सिंगापूरमध्ये आहेत. आयपीसी, सीआरपीसीच्या तरतुदीनुसारच सिंगापूर पोलीस काम करतात. तेथील शिक्षेची तरतूदही सारखीच आहे. न्यायप्रक्रिया गतिमान असून खटले वेळेत निकाली निघतात.
कम्युनिटी पोलिसिंग नेमकी काय संकल्पना आहे ?
सिंगापूरमध्ये प्रत्येक तरूणाला किमान दोन वर्षे पोलीस दलात काम करण्याची सक्ती आहे. कम्युनिटी पोलीस पूर्ण अधिकाराने कर्तव्य बजावतात. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पोलीस व सैन्याविषयी वेगळी आस्था आहे. शिवाय यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. प्रत्येक जण जबाबदारीने कायदे पाळतो. ५६ लाख लोकसंख्येचा देश असल्याने तेथे हा प्रयोग अतिशय यशस्वी झाला आहे.
पोलीस कुठल्या हायटेक तंत्राचा वापर करतात?
सिंगापूरमधील इंचन् इंच भूभाग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे. त्यामुळे गुन्हा घडला तरी काही मिनिटातच आरोपीची ओळख पटवणे शक्य होते. शिवाय कामाचा ताण नसल्याने प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करते. तेथे कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पथक स्वतंत्र आहे. वाहतूक पोलीस केवळ वाहतुकीवरच लक्ष ठेवतात. गुन्हे व आरोपींचा शोध घेणारी स्वतंत्र शाखा आहे. त्यांना आपली शाखा सोडून कोणतचे काम दिले जात नाही. उलट महाराष्ट्र पोलिसांची सर्वाधिक एनर्जी बंदोबस्तामध्येच खर्च होते. अनेकदा हातचा तपास सोडून पळावे लागते. ही अडचण सिंगापूर पोलिसांना नाही. सगळ्यात मोठी समस्या संख्याबळाची आहे. याचा समतोल कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून साधल्यास निश्चितच गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन पोलिसांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे शक्य आहे.

सिंगापूर पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस अधिक सक्षम आहेत. प्रचंड काम व अपुऱ्या मनुष्यबळावरही येथे काम करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्र पोलीस सायबर क्राईममध्ये एक्सपर्ट आहेत. गुन्हे घडत नसल्याने सिंगापूर पोलिसांकडे पुरेसा अनुभव दिसत नाही.
बंदोबस्ताचा ताण तणाव नाही
सिंगापूरमध्ये मंत्री, आमदारही स्वत:च गाडी चालवितात. व्हीआयपी व सार्वजनिक बंदोबस्ताचा तेथील पोलिसांवर कोणताच ताण नाही. कठोर कायदे अंमलबजावणी व आर्थिक समानतेमुळे प्रत्येक जण कायद्याचे पालन करतो. तेथे पोलिसांना प्रचंड आदर आहे. हे वातावरण उच्च तंत्रज्ञान व कम्युनिटी पोलिसिंगमुळे शक्य झाले आहे. ही संकल्पना आपल्याकडे राबविल्यास युवकांना बेरोजगारीच्या काळात मानधनावर काम करता येईल. शिवाय कायदे पाळण्याचे संस्कार त्यांच्यात रुजल्याने गुन्हे नियंत्रणास मदत होऊ शकते. पोलीस हा आपल्या सुरक्षेसाठी आहे ही भावना वाढीस लागण्यास मदत होते. शिवाय तारुण्यातच जबाबदारीचे भान
येते.

Web Title: Manoj Kedare - Independent Cell of Community Policing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.