Maharashtra Election 2019 ; सेना बंडखोर समर्थकांच्या घोषणाबाजीने नेते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:04+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे.

Maharashtra Election 2019 ; Leader angry at the announcement of sena rebel supporters | Maharashtra Election 2019 ; सेना बंडखोर समर्थकांच्या घोषणाबाजीने नेते संतप्त

Maharashtra Election 2019 ; सेना बंडखोर समर्थकांच्या घोषणाबाजीने नेते संतप्त

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : बंडखोर कुणालाच जुमानेना !

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभेच्या रणधुमाळीत उतरलेले राजकीय पक्षांचे बंडखोर आपल्या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी यवतमाळात एका हॉटेलमध्ये पहायला मिळाले. सेना बंडखोराच्या समर्थकांनी चक्क आपल्या पक्षाच्या नेत्यासमोरच ‘अंगार-भंगार’ असे नारे दिल्याने हे नेते चांगलेच संतप्त झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यांचे बंड थंड करण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आले. म्हणून खास ‘मातोश्री’च्या मर्जीतील संपर्क नेते अनिल देसाई यवतमाळात आले होते. परंतु त्यांचा आदेशही स्थानिक बंडखोरांच्या लेखी बेदखल ठरला. शिवसेना प्रमुखांच्या आदेशावर चालणारी शिवसेना आता ‘मातोश्री’च्या आदेशालाही जुमानत नसल्याने या शिवसैनिकांवरील नेत्यांची पकड सैल झाल्याचे मानले जाते.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गतवेळी भाजपला जोरदार टक्कर देणारे व निसटता पराभव स्वीकारावे लागलेले संतोष ढवळे यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे उमेदवार पालकमंत्री मदन येरावार यांच्यापुढे त्यांनी आव्हान उभे केले. युतीच्या हक्काच्या मतांमध्ये विभागनी होण्याची चिन्हे पाहता ढवळे यांना थांबविण्यासाठी जोरकस प्रयत्न झाले. शहरातील एका हॉटेलमध्ये भाजप-सेनेचे दोन्ही प्रमुख नेते व अन्य पदाधिकाऱ्यांची नामांकन परत घेण्याच्या दिवशी बैठक बोलविली. परंतु तेथे नेत्यांचे काही ऐक ऐकून घेण्याऐवजी ढवळेंच्या समर्थकांनी अंगार-भंगार असे नारे नेत्यांसमोरच लावले. ते पाहून ‘आतापर्यंत आपण ज्यांना ताकद देत होतो, ते आपल्या पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी हेच का’ यावर शिवसेनेच्या नेत्यांचा विश्वासच बसत नव्हता. या प्रकाराने सेनाच नव्हे तर भाजपचे उपस्थित प्रमुख दोन्ही नेते संतप्त झाले. परंतु त्यांनी निवडणूक असल्याने संताप आवरला. मात्र नेत्यांसमोर शिवसैनिकांनी केलेल्या या घोषणाबाजीची शिवसेनेत चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेच्या बंडखोरांमुळे यवतमाळ, वणी, उमरखेड या तीन मतदारसंघातील भाजपच्या जागा धोक्यात आल्या आहे. भाजपमध्येही बंडखोरी झाली आहे. आर्णीमध्ये भाजपचे माजी आमदार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात दंड थोपटून आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. दिग्रस मतदारसंघातसुद्धा भाजपची बंडखोरी असली तरी सेनेला खरोखरच किती ‘मायनस’ करते याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.

बंडखोरांवर होणार निलंबन कारवाई
यवतमाळप्रमाणे वणी व उमरखेडचे शिवसेनेचे बंडखोरही पक्षादेशाला जुमाणण्यास तयार नाही. आपली ही शेवटची लढाई व अखेरची संधी म्हणून हे बंडखोर रिंंगणात उतरले आहे. सूत्रानुसार, मुंबईत बंडखोरांच्या विषयाच्या अनुषंगाने भाजप-शिवसेनेच्या प्रमुखांची लवकरच संयुक्त पत्रपरिषद होणार असून त्यात राज्यभरात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध रिंगणात उतरलेल्या तमाम बंडखोरांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Leader angry at the announcement of sena rebel supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.