Maharashtra Election 2019 ; बंडखोरांच्या माघारीसाठी युतीत ‘सशर्त’ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 10:20 PM2019-10-05T22:20:17+5:302019-10-05T22:21:37+5:30

दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी.

Maharashtra Election 2019; 'Conditional' proposal in the coalition for the withdrawal of the rebels | Maharashtra Election 2019 ; बंडखोरांच्या माघारीसाठी युतीत ‘सशर्त’ प्रस्ताव

Maharashtra Election 2019 ; बंडखोरांच्या माघारीसाठी युतीत ‘सशर्त’ प्रस्ताव

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । दिग्रसमध्ये भाजपची माघार असेल तरच यवतमाळ, उमरखेड, आर्णी, वणीत शिवसेनेचा ‘विड्रॉल’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती असली तरी पाच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांच्या भूमिकेवर युतीच्या उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. तुम्ही दिग्रसमध्ये माघार घ्याल तरच आम्ही यवतमाळ, आर्णी, वणी व उमरखेड विधानसभा मतदारसंघात माघार घेऊ असा सशर्त प्रस्ताव शिवसेनेने भाजपकडे ठेवल्याची माहिती आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसेनेपुढे खरी डोकेदुखी ठरली ती माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची बंडखोरी. देशमुख रिंगणात असल्यास युतीला मिळणाऱ्या मतांचे विभाजन निश्चित आहे. देशमुख यांनीही शिवसेनेच्याच बरोबरीने नामांकनाच्या वेळी शक्तीप्रदर्शन करताना गर्दी जमविली होती. या गर्दीने शिवसैनिकांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहे. मतदारसंघातील राजकारण देशमुखांच्या भोवती केंद्रीत होण्याचे व राठोड विरोधकांची त्यांना साथ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संजय राठोड यांनी आधी भाजप बंडखोर संजय देशमुख यांची उमेदवारी मागे घ्या असा जोरदार आग्रह जिल्हा व राज्याच्या भाजप श्रेष्ठींपुढे ठेवला आहे. देशमुखांनी माघार घेतली तरच शिवसेनेतील बंडखोरी मागे घेता येईल, असा तडजोडीचा प्रस्ताव ठेवला गेला. वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनील कातकडे, आर्णीत नयना शैलेश ठाकूर, अमोल मंगाम, यवतमाळ मतदारसंघात संपर्क प्रमुख संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले तर उमरखेड मतदारसंघात डॉ. विश्वनाथ विणकरे, निर्मला विणकरे यांनी बंडखोरी केली. या बंडखोरांमुळे भाजपच्या चार जागा वांद्यात येऊ शकतात. त्या तुलनेत सेनेला एकाच जागेवर आणि तेही मतांची आघाडी कमी होण्यापुरतेच नुकसान होऊ शकते, असा राजकीय अंदाज आहे.
शिवसेनेचा प्रस्ताव असला तरी भाजप व सेनेतील बंडखोर खरोखरच माघार घेतील का, याबाबत साशंकता आहे. कारण संजय देशमुख भाजप बंडखोर मानले जात असले तरी त्यांनी अपक्ष राहून पर्यायी आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न चालविला होता. त्यामुळे त्यांनी भाजप सोडल्यात जमा असल्याचे मानले जाते. पर्यायाने भाजप श्रेष्ठींचे ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच ते रिंगणात कायम राहतील असा अंदाज वर्तविला जात आहे. अशीच स्थिती यवतमाळ, आर्णी व उमरखेड मतदारसंघात आहे. संतोष ढवळे, नयना ठाकूर, विश्वनाथ विणकरे यांचा निर्धार पक्का असल्याने ते माघार घेण्याची चिन्हे नाहीत. सेनेतील या असंतुष्टांना मुंबईतून मूकसंमती तर नाही ना अशीही शंका व्यक्त होते.

एक लाख मतांच्या आघाडीचे काय ?
दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी २०१४ च्या निवडणुकीत राज्यात दुसºया क्रमांकाची सर्वाधिक ८० हजार मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या क्रमांकाची आघाडी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी मतांची ही आघाडी एक लाखांवर नेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उमेदवारीने राठोड यांचे स्वप्न भंगणार तर नाही ना याची हूरहूर पहायला मिळते.

वणीत सेनेची बंडखोरी भाजपच्या फायद्याची
जिल्ह्यात पुसद व राळेगाव वगळता पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी आहे. या बंडखोरांना बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. ही बंडखोरी पक्षाच्या उमेदवारासाठी कशी नुकसानकारक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न अधिकृत उमेदवारांकडून श्रेष्ठींकडे केला जात असताना वणी मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. तेथे शिवसेनेचे विश्वास नांदेकर व सुनील कातकडे यांनी युतीत असतानाही केलेली बंडखोरी भाजपसाठी फलदायी ठरणार असल्याचा भाजप उमेदवाराच्या समर्थकांचा युक्तीवाद आहे.

Web Title: Maharashtra Election 2019; 'Conditional' proposal in the coalition for the withdrawal of the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.