काल के कपाल पे लिखता और मिटाता हूं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:48 PM2021-01-15T12:48:19+5:302021-01-15T13:00:55+5:30

९८ वर्षांचे गुरुजी दररोज आपल्या एका हातावर ‘सत्य’ लिहितात अन् दुसऱ्या हातावर ‘धर्म’ लिहितात. नुसते लिहीतच नाहीत, तर समाजाला त्याच वाटेवर नेण्यासाठी धडपडतात.

I write and erase on the palm of time ... | काल के कपाल पे लिखता और मिटाता हूं...

काल के कपाल पे लिखता और मिटाता हूं...

googlenewsNext
ठळक मुद्दे९८ वर्षीय शिक्षकाची समाजासाठी धडपड एका हातावर सत्य, दुसऱ्यावर धर्म... पगार वाटला.. पेन्शनही वाटली

अविनाश साबापुरे

यवतमाळ : जुन्या पिढीतले गुरुजी कसे होते, हे पाहायचे असेल तर चला महागाव तालुक्यात. मुडाणा गावात. स्वत:जवळचे होते नव्हते ते सारे समाजाला देऊन वाचनात व्यग्र झालेले हे ९८ वर्षांचे गुरुजी दररोज आपल्या एका हातावर ‘सत्य’ लिहितात अन् दुसऱ्या हातावर ‘धर्म’ लिहितात. नुसते लिहीतच नाहीत, तर समाजाला त्याच वाटेवर नेण्यासाठी धडपडतात. ते घराबाहेर पडले, की लोक त्यांच्या हाताकडे पाहून परमार्थाचा धडा शिकतात. नव्या काळातले ‘संत तुकाराम’ ठरावे, अशा या वल्लीचे नाव आहे कोंडबाजी लिंबाजी ठाकरे.

महागाव, वडद, मुडाणा अशा गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरी केल्यावर साधारण ४० वर्षांपूर्वीच ठाकरे निवृत्त झाले. नोकरीत होते तेव्हापासून तर आज ९८ वर्षांचे वय झाले तरीही आपल्याजवळ जे काही असेल ते समाजाचे आहे याच भावनेने त्यांचा ‘दान महोत्सव’ चाललेला. पगार वाटप झाला, आता पेन्शनही वाटतच राहतात. घरची शेतीही तानाजी, शिवाजी, राम, श्याम, बंडू या मुलांमध्ये वाटून दिली. गावातील समाजमंदिरासाठी अर्धा एकर जमीन दिली. तर स्वत: धार्मिक वाचनात गढून गेलेले. सकाळी थंड पाण्याने अंघोळ, त्यानंतर भगव्या रंगाचा मार्कर पेन घेणे, त्याने दोन्ही हातांवर ‘सत्य’ आणि ‘धर्म’ हे दोन शब्द मोठ्या आकारात लिहिणे, मंदिरात जाणे, ११ वाजता जेवण, नंतरच दिवसभर वाचन, सायंकाळी आरती अन् पुन्हा वाचन हा त्यांचा शिरस्ता. हातावर सत्य-धर्म लिहिल्यामुळे आपल्या हातून वाइट कृत्य घडणार नाही, हा त्यांचा मूलमंत्र आहे. त्यातून गावही प्रेरणा घेत आहे. रोज सत्य-धर्म लिहिणे-मिटविणे-पुन्हा लिहिणे हा त्यांचा प्रघात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे जिवंत रूप ठरले आहे....

काल के कपाल पे

लिखता और मिटाता हूं

गीत नया गाता हूं

गीत नया गाता हूं...

मी सध्या अग्निपुराण वाचतोय. आपण गेल्यावर आपले सारेकाही आपल्यासोबतच जळते. पण आपले सत्य आणि आपला धर्म कधीच जळत नाही. या दोन मंत्रानुसार आपले आचार, विचार आणि उच्चार असला पाहिजे. लंकेत जाण्यासाठी सेतू बांधताना नुसते दगड टाकले असते तरी चालले असते. पण सेनेने प्रत्येक दगडावर राम लिहिले. मी माझ्या हातावर सत्य व धर्म लिहितो ते त्याच भावनेतून.

- कोंडबाजी ठाकरे, निवृत्त शिक्षक

एकजण आला अन् अचानक पैसे देऊन गेला

हाती असले नसले सारे पैसे कोंडबाजी ठाकरे गरजूंना देऊन टाकतात. कुणाला परतही मागत नाहीत. पण परवा ते बसस्टॅण्डवर उभे असतानाच अचानक एक माणूस आला. त्यांच्या पाया पडला आणि पैशाचे बंडल त्यांच्या हाती दिले. कोंडबाजींना काही कळले नाही, कसले पैसे? तो माणूस म्हणाला, तुम्ही मला एकदा दिले होते. वाटले तर व्याजही घ्या... कोंडबाजी म्हणाले, मला नको पैसे. त्यांनी तेही पैसे परत केले. ते पाहून तो माणूस अक्षरश: त्यांच्या पायावर नतमस्तकच झाला. हेच सत्य अन् हाच खरा धर्म!

जमीन मी देतो.. पण दवाखाना बांधा!

पाच हजार लोकसंख्येचे मुडाणा मोठे गाव आहे. पण तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे हे केंद्र व्हावे म्हणून ९८ वर्षांचे कोंडबाजी ठाकरे धडपडत आहेत. मागील वर्षी त्यांनी स्वत: त्यासाठी मुंबईवारी केली. पण जागा नसल्याच्या कारणावरून हे केंद्र वडदला गेले. त्यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी लोकप्रतिनिधीला जाहीर सांगितले, हवे तर जागा मी देतो पण दवाखाना गावात आणा. मध्यंतरी त्यांनी समाजमंदिरासाठीही अर्धा एकर जमीन दिली. मी माझे सर्वस्व दिले आहे. आता भगवंताच्या कृपेने जगतोय. सतत देत राहण्यामुळे मला आनंदाची झोप लागते, अशी कृतार्थ भावना कोंडबाजी ठाकरे यांनी व्यक्त केली.

Web Title: I write and erase on the palm of time ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.