भीसीतील कोट्यवधींच्या व्यवहारात गुंडांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:16+5:30

‘भीसी व्यवसायात आठ कोटींनी फसवणूक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर ऑर्गनायझर, सब-ऑर्गनायझर व भीसीच्या माध्यमातून मासिक लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याचवेळी या भीसी व्यवसायात ‘लोकमत’ने आणखी खोदकाम करून सखोल माहिती घेतली असता सर्वकाही डोळे विस्फारणारे ठरले आहे.

Hooliganism is involved in the dealing of billions in Bhisi | भीसीतील कोट्यवधींच्या व्यवहारात गुंडांचा शिरकाव

भीसीतील कोट्यवधींच्या व्यवहारात गुंडांचा शिरकाव

Next
ठळक मुद्देवसुलीसाठी उचलून नेऊन मारहाण : मार्इंदे चौक मार्गावरील बैठकही बारगळली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील व्यापारी-व्यावसायिकांची भीसी व्यवसायात कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाल्यानंतर या रकमेच्या वसुलीसाठी चक्क गुंडांची मदत घेतली जात आहे. त्यातूनच या गुंडांनी गेल्या आठवड्यात एकाला उचलून नेऊन मारहाण करण्याचा प्रयोग केला.
‘भीसी व्यवसायात आठ कोटींनी फसवणूक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर ऑर्गनायझर, सब-ऑर्गनायझर व भीसीच्या माध्यमातून मासिक लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याचवेळी या भीसी व्यवसायात ‘लोकमत’ने आणखी खोदकाम करून सखोल माहिती घेतली असता सर्वकाही डोळे विस्फारणारे ठरले आहे. बोरेलेनगर परिसरातील भीसीत फसवणूक करणाऱ्या शक्ती नामक युवकावर गुंडांनी निशाणा साधला. हा शक्ती अलीकडेच गडगंज बनला. गुड्डू नामक व्यापाऱ्याचा पैसा तो आधी सावकारीत वाटत होता. मात्र नंतर तो स्वत:च भीसी व्यवसायात सक्रिय झाला. त्याने भीसीतील गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा आकडा बराच मोठा आहे. गेल्या आठवड्यात जाजू चौक परिसरातील सट्टेबाज नीलेश, गुन्हेगारी वर्तूळातील रवी यांनी शक्तीला उचलून बाजारात नेले. तेथे त्याला मारहाण करून धमकाविण्यात आले. मात्र याची कुणकुण लागताच त्याच्या पित्याने आत्महत्येची धमकी दिल्याने त्याला सोडले गेले. त्यानंतर नीलेश व रवी यांनी याच पैशासाठी मार्इंदे चौक मार्गावरील एका चौकात बैठक लावली. शक्ती पूर्वी ज्याच्या सावकारीचा पैसा वाटत होता त्या गुड्डूला या बैठकीत मध्यस्थी ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकूणच प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे पाहता गुड्डूने या बैठकीतून अंग काढले. याच मुद्यावरून लगतच्या भविष्यात गुन्हेगारी वर्तुळातून आणखी काही नव्या घटना घडविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुळात यवतमाळ शहरातील धामणगाव रोडस्थित दोन बंधूंनी भीसीच्या या व्यवसायात सर्वाधिक फसवणूक केली आहे. आधी ते मिल चालवायचे. नंतर त्यांनी ही मिल एकाला विकली. पुढे ही मिलच ‘त्या’ व्यक्तीच्या जीवावर उठली. या दोन बंधूंकडे १५० पेक्षा अधिक भीसीचे गट असल्याचे सांगितले जाते. शहरात हे दोन बंधू भीसीचे प्रमुख ऑर्गनायझर असून त्यांच्याशी अनेक सब-ऑर्गनायझर ‘कनेक्ट’ आहेत. निरंजन, चंदन यासारख्या अनेक सब-ऑर्गनायझरनेही त्या बंधूंकडे भीसीतून पैसा गुंतविला. मात्र आज त्या बंधूंनी हात वर केल्याने अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली. गुंतविलेला पैसा रेकॉर्डवर नसल्याने पोलिसात फसवणुकीची तक्रार द्यावी कशी, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यातूनच मग वसुलीसाठी पोलिसांऐवजी चक्क गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांची मदत घेतली जात आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये मेडिकल, किराणा, ढेप, तेल, गॅस शेगडी, सिमेंट, लोहा अशा अनेक व्यावसायिकांचा समावेश आहे.
कोणत्याही भीसीत दीड ते दोन टक्क्यांपेक्षा अधिक रकमेची मार्जीन नसते. मात्र त्या बंधूंनी तीन टक्क्यांपेक्षा अधिक मार्जीन ठेवली, तेव्हाच ही भीसी बुडणार असे स्पष्ट संकेत मिळाले होते. मात्र गुतवणूकदारांनी त्याकडे लालसेपोटी दुर्लक्ष केले. एका व्यापाºयाकडील दिवाणजीच्या मुलानेसुद्धा अशाच एक कोटीच्या भीसीतून फसवणूक केली आहे. फसवणूक करणारे भीसी ऑर्गनायझर शहरात विविध भागात छुटपुट दुकाने घेऊन बसले असून तेथे ग्राहकीचे दर्शन दुर्लभच आहे. मात्र त्यानंतरही त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयात सुरू आहे. ही उलाढाल प्राप्तिकर खात्यासाठी खुले आव्हान ठरले आहे. भीसीतून सुमारे दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीचे एक मोठे प्रकरण जिल्ह्यात घडले आहे.
अवधूतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रारही दिली गेली. पोलिसांनी या प्रकरणात त्या गावात जाऊन संबंधितांची बयाणेही नोंदविल्याचे सांगितले जाते. एकूणच भीसी व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण पोलीस रेकॉर्डवर येण्यास आणखी किती वेळ लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

भीसीतील फसवणुकीचा आकडा २० कोटींवर
भीसी व्यवसायातून व्यापाऱ्यांची फसवणूक झालेली रक्कम आठ कोटी असल्याचे प्रथम दर्शनी पुढे आले होते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तानंतर या भीसी व्यवसायातील ऑर्गनायझर, सब-ऑर्गनायझर, त्यांचा मूळ व्यवसाय, सध्याचा व्यवसाय, गुन्हेगारी वर्तूळातील उठबस, फसविले गेलेले व्यापारी कोण, पैसा दोन नंबरचा असल्याने फौजदारी तक्रार देताना त्यांची होणारी अडचण आदी अनेक बाबी प्रकर्षाने समोर आल्या आहेत. त्यातूनच भीसीतील फसवणुकीचा हा आकडा २० कोटींपेक्षा अधिक असल्याचेही बोलले जाते. त्याचवेळी २० वर्षांपासून प्रामाणिकपणे भीसी चालविणारे, कुणाचीही फसवणूक न करणाऱ्या सब-ऑर्गनायझरची नावेही पुढे आली आहे.

म्हणे, मोह-मायेचा त्याग
भीसी गुंतवणूकदारांना आठ कोटींनी गंडा घालणारा किराणा व्यापारी आता पैसे मागायला येणाºया गुंतवणूकदारांपुढे थेट मानसिक रुग्ण बनून येतो. त्याच्या हाती धर्मग्रंथ राहतो. आपण मोह-मायेतून बाहेर पडल्याचे तो सांगतो. त्याचे कुटुंबीय मग आमच्याकडे पैसे नाहीत, भविष्यात आले तर नक्की देऊ, असे सांगतात. प्रत्यक्षात यातील निरंजन याने पुण्यामध्ये प्रॉपर्टी घेतल्याचे सांगितले जाते. यावरून आठ कोटींनी फसविणाऱ्या ऑर्गनायझरचा आजार व मोह-मायेतून बाहेर पडल्याचे सांगणे निव्वळ ढोंग असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Hooliganism is involved in the dealing of billions in Bhisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.