पाच तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:28+5:30

बाभूळगावमध्येही अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याने राज्य मार्गावरील वृक्ष उन्मळून पडले. दारव्हा आणि अमरावती मार्गावर हा प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाला. रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांनी आपला मार्ग बदलवून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविली. मात्र दारव्हा आणि अमरावती मार्गावर वृक्ष आडवे पडल्याने शेतशिवारातून वाहनांना रस्ता काढावा लागला. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

Heavy rains hit five talukas | पाच तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

पाच तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी काही ठिकाणी पाऊस कोसळला. शुक्रवारी यवतमाळ, राळेगाव, नेर, दारव्हा आणि बाभूळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात शेतशिवारामध्ये काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकही ठप्प झाली. 
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणामध्ये अचानक बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. शहरातील बहुतांश भागामध्ये ही गारपीट पाहायला मिळाली. गारपिटीमुळे शहरालगतच्या शेतशिवारात नुकसान झाले. विशेष करून फूल उत्पादकांना याचा फटका बसला. यवतमाळसह राळेगाव, नेर, दारव्हा आणि बाभूळगावमध्येही अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्याने राज्य मार्गावरील वृक्ष उन्मळून पडले. 
दारव्हा आणि अमरावती मार्गावर हा प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळाला. रहदारीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांनी आपला मार्ग बदलवून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविली. मात्र दारव्हा आणि अमरावती मार्गावर वृक्ष आडवे पडल्याने शेतशिवारातून वाहनांना रस्ता काढावा लागला. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. 
गुरुवारी उमरखेड, पुसदमध्ये आणि महागावमध्ये जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी हाच पाऊस पाच तालुक्यामध्ये बरसला. अचानक आलेल्या या पावसाने यवतमाळ शहरातही नागरिकांची धांदल उडाली. दुकानाबाहेरील मालाचे नुकसान होवू नये यासाठी व्यापारी धावपळ करीत होते. पावसामुळे दारव्हा तालुक्यातील चाणी येथे टीनपत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

बोथबोडण, गहुली हेटीमध्ये उडाले टीनपत्रे
शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ शहरासह विविध ठिकाणी झालेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. गारपिटीसह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे माैजे बोथबोडण व गहुली हेटी येथील काही घरांचे टीनपत्रे उडून नुकसान झाले आहे. 

भूईमुग झाला ओला, तीळासह कांद्याच्या पिकातही साचले पाणी
सध्या शेतशिवारामध्ये भुईमूग काढणीचे काम वेगात सुरू आहे. याच परिस्थितीत पाऊस बरसल्याने काढणी झालेला भुईमूग पुन्हा ओला झाला आहे. या सोबतच तीळ आणि कांदा हे पीकही शेतशिवारात उभे आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतशिवारातील कामकाजाचे गणित बिघडविले आहे. भाजीपाला पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. गारपिटीने काही भागातील काढणीला आलेले सांभार आणि पालकाचे पीक वाया गेले. या सोबतच गावरान आंबा उशिरा येत असल्याने तो झाडावरच आहे. वादळी वाऱ्याने आंब्याची फळे गळून पडली. याचा गावरान आंबा उत्पादकाला मोठा फटका बसला. 

यवतमाळामध्ये गारपीट
यवतमाळ शहरात शुक्रवारी रात्री गारपीट झाली. शहरातील संभाजीनगर, रंभाजीनगर, वैशालीनगर, वाघापूर, दर्डानगर, गांधी चाैक, माळीपुरा या भागामध्ये बोराच्या आकाराच्या गारा बरसल्या. गारा बरसू लागल्यानंतर चिमुकल्यांनी अंगणातील गारा वेचल्या. शुक्रवारी रात्री समाज माध्यमावरही गारांचे फोटो व्हायरल झाले होते. 

यवतमाळ : शुक्रवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. दारव्ह्याकडून ट्रकचालक पाऊस पडत असल्याची खबर घेऊन यवतमाळात आले. त्याच वेगाने शहरात पाऊसही येऊन धडकला. यवतमाळसह पाच तालुक्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यवतमाळात गारपिटीसह पाऊस झाल्याने शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. 
 

 

Web Title: Heavy rains hit five talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस