पाहुणा आला अन् कोरोना देऊन गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:11+5:30

लोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीतील एका कुटुंबाकडे दोन-तीन दिवसांपूर्वी अमरावतीचा पाहुणा आला होता. एक दिवसाच्या मुक्कामानंतर तो पाहुणा परत अमरावतीला गेला. तेथे त्याला प्रकृतीत बिघाड जाणवला. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये तो पाहुणा अमरावतीत पॉझिटिव्ह आढळून आला.

The guest came and gave it to Ancorona | पाहुणा आला अन् कोरोना देऊन गेला

पाहुणा आला अन् कोरोना देऊन गेला

Next
ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू : पोलीस मित्र सोसायटीतील घटना, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सुरुवातीला आंतरजिल्हा प्रवासाला बंदी होती. मात्र या बंदीत शिथीलता मिळाल्याने अनेक नागरिक ई-पास काढून आंतरजिल्हा प्रवास करीत आहे. यातूनच येथील पोलीस मित्र सोसायटीत अमरावती येथील एका पाहुणा आला अन् नातेवाईकांना कोरोनाची भेट देऊन गेल्याचे उघडकीस आले आहे.
लोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीतील एका कुटुंबाकडे दोन-तीन दिवसांपूर्वी अमरावतीचा पाहुणा आला होता. एक दिवसाच्या मुक्कामानंतर तो पाहुणा परत अमरावतीला गेला. तेथे त्याला प्रकृतीत बिघाड जाणवला. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये तो पाहुणा अमरावतीत पॉझिटिव्ह आढळून आला. आपल्या घरी आलेला पाहुणा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळताच पोलीस मित्र सोसायटीतील त्या कुटुंबानेही खबरदारी म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची यवतमाळात कोरोना चाचणी करवून घेतली. सर्व कुटुंबीय यवतमाळच्या कोविड सेंटरमध्ये पोहोचले. तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात घरातील एका महिलेचाही समावेश होता. कोविड सेंटरमध्ये स्वॅब दिल्यानंतर संपूर्ण कुटुंब पोलीस मित्र सोसायटीतील आपल्या घरी परतले.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या कुटुंबातील एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत या कुटुंबाचे कोरोना अहवाल अप्राप्त होते. रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाला. त्यात मृत झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासमोर त्या महिलेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न उपस्थित झाला. नेमका अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत कुटुंबीयांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. यादरम्यान गुरुवारी रात्रभर मृतदेह घरातच होता. प्रशासनाने केवळ अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू आहे, एवढेच त्या कुटुंबाला कळविले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या कुटुंबाची तगमग वाढली.
शुक्रवारी दुपारपर्यंत त्या महिलेवरील अंत्यसंस्काराचा तिढा कायम होता. कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्यात सतत चर्चा सुरूच होती. शुक्रवारी दुपारी २ वाजतापर्यंत जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नगरपरिषद आदींमध्ये केवळ चर्चाच सुरू होती. त्या महिलेवर नेमका कुणी आणि कसा अंत्यसंस्कार करावा, हा पेच कायम होता.
टेस्टला बगल, अहवालास विलंब
लोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीमधील त्या कुटुंबाची रॅपिड अ‍ॅन्टीजन किटद्वारे तपासणी केली असती तर त्वरित अहवाल मिळणे शक्य होते. या चाचणीमुळे कुटुंबीयांना त्वरित आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे याबाबत माहिती मिळू शकली असती. मात्र प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये त्या कुटुंबीयांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेतली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांचा अहवाल येण्यास विलंब झाला. संबंधित महिला मृत्युमुखी पडल्यानंतरच सर्वांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ती महिला पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे घोळात भर पडली.

जिल्ह्यात ३३ रुग्णांची भर : तर २१ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात नव्या ३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर यवतमाळ शहरातील ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह््यात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या ४१ झाली आहे. २१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात ३३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात १२२ रुग्ण भरती आहे. शुक्रवारी दोन रुग्णांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. शुक्रवारी सर्वाधिक १३ पॉझिटिव्ह रुग्ण पुसदमध्ये आढळून आले. त्या खालोखाल दहा रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. पांढरकवडा येथे सहा, दिग्रसमध्ये तीन, वणीमध्ये एक, उमरखेडमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाच्या १३९० रुग्णांची प्रशासनाने नोंद केली आहे. त्यापैकी १०१५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत २३ हजार ३९७ स्वॅब नमुने तपासणीला पाठविले. त्यापैकी १९ हजार ८४१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ३५५६ अहवालांची प्रतीक्षा अहे.

Web Title: The guest came and gave it to Ancorona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.