गणेशोत्सवात शांततेसाठी महानिरीक्षक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:08+5:30

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे पाचही जिल्ह्यात बहुतांश दिवस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचा व त्यामुळे अधिनस्त संपूर्ण यंत्रणा चार्ज झाल्याचा हा परिणाम असल्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सांगत आहे.

Ganeshotsav inspector general goes down the road for peace | गणेशोत्सवात शांततेसाठी महानिरीक्षक उतरले रस्त्यावर

गणेशोत्सवात शांततेसाठी महानिरीक्षक उतरले रस्त्यावर

Next
ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था अबाधित : पोलिसांचे परिश्रम, कार्यकर्त्यांची समझदारी व नागरिकांच्या सहकार्याला श्रेय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डझनावर संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असलेल्या, सण-उत्सवात हमखास जातीय दंगलींचा इतिहास असलेल्या अमरावती परिक्षेत्रात यावर्षी पहिल्यांदाच गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्याचे श्रेय विविध घटकांना दिले जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उत्सव काळात खुद्द पोलीस महानिरीक्षक सतत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी स्वत: गल्लीबोळात शिरुन विसर्जन मिरवणुकीचे मार्ग व ठिकाणांची पाहणी केली.
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे पाचही जिल्ह्यात बहुतांश दिवस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचा व त्यामुळे अधिनस्त संपूर्ण यंत्रणा चार्ज झाल्याचा हा परिणाम असल्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सांगत आहे. तर कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडलेल्या या गणेशोत्सवाचे श्रेय महानिरीक्षक रानडे हे पोलिसांचे टीम वर्क, त्यांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून घेतलेले परिश्रम, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची समझदारी, नागरिकांनी केलेले सहकार्य आदी बाबींना देत आहेत.
गणेशोत्सव म्हटला की पोलिसांच्या डोक्याला टेंशन ठरलेलेच. प्रचंड परिश्रम घेऊनही परिक्षेत्रात कुठे ना कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे संपूर्ण उत्सवाला गालबोट लागते. परंतु यंदाचा गणेशोत्सव त्याला अपवाद ठरला आहे. अमरावती परिक्षेत्रात रुजू होताच पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पाचही जिल्ह्यात प्रत्यक्ष भेटी देऊन भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवावर लक्ष केंद्रीत केले.
आतापर्यंत केवळ एसपींच्या बैठका घेण्याची परंपरा होती. ती रानडे यांनी मोडित काढत थेट उपअधीक्षकांच्या कार्यालयांमध्ये जाऊन बैठका घेण्याचा पायंडा पाडला. संवेदनशील ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणे, गणेश विसर्जन मिरवणुकीचे मार्ग दिवसाच नव्हे तर रात्रीसुद्धा तपासणे, कुठे अंधारात दगा फटका होऊ शकतो हे ओळखून तेथे विद्युत व्यवस्था करणे, अधिक बंदोबस्त तैनात करणे, उपद्रवाचा इतिहास असलेल्या तसेच मानाच्या गणेश मंडळांमध्ये स्वत: आरतीला जाणे, तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करणे, धार्मिक स्थळ ताब्यात घेण्यासारखे २५ वर्षांपासूनचे प्रकार थांबविणे, स्वत: १६ ते १८ तास फिल्डवर राहणे, वादग्रस्त मंडळांच्या मिरवणुकीच्या वेळी स्वत: हजर राहणे, संवेदनशील गावांमध्ये मुक्काम करणे आदीबाबी महानिरीक्षकांनी स्वत:च्या देखरेखीत करून घेतल्या.

खुल्या तलवारींना ब्रेक
वाशिममधील मिरवणुकीत नंग्या तलवारी फिरविण्याच्या परंपरेला यावर्षी पहिल्यांदाच ब्रेक लावला गेला. त्यासाठी काही जणांच्या घराची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त केल्या गेल्या. पोलिसांच्या परिश्रमामुळेच अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात छुटपुट घटना वगळता गणेशोत्सव शांततेत पार पडला. आता पोलिसांपुढे आगामी विधानसभा निवडणुका व दुर्गोत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे.

ठाणेदारांना ४० मुद्यांची चेकलिस्ट
गणेशोत्सवातील शांततेसाठी सर्व ठाणेदारांना ४० मुद्यांचा समावेश असलेली चेकलिस्ट देण्यात आली होती. त्यात क्रियाशील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसह उपरोक्त बाबींचा समावेश आहे. पोलिसांच्या दिमतीला सर्व पाचही जिल्ह्यात एसआरपीएफ जवानांसह अकोल्यासाठी खास रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले होते.

गणेशोत्सवातील शांतता हे कोण्या ऐकाचे श्रेय नाही. पोलिसांचे टीम वर्क तसेच नागरिकांचे सहकार्य, सहभाग, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून केलेले काम, पोलिसांच्या सूचना व विनंतीला दिलेला मान यामुळे परिक्षेत्रात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
- मकरंद रानडे
विशेष पोलीस महानिरीक्षक,
अमरावती परिक्षेत्र.

Web Title: Ganeshotsav inspector general goes down the road for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.