अखेर ‘त्या’ मुलींना मिळाली हक्काची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:15+5:30

अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वातावरणातून दूर खास वसतिगृहात ठेवण्यात आले.

Finally, the girls got the rights school | अखेर ‘त्या’ मुलींना मिळाली हक्काची शाळा

अखेर ‘त्या’ मुलींना मिळाली हक्काची शाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सावित्री’ची मिळाली सावली : अमरावतीच्या संवेदनशील माणसाची यवतमाळात छत्रछाया

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फांदीवर उगवलेल्या कळीला ठाऊक नसते, ती फुल होऊन देवाच्या चरणी अर्पण होणार आहे, की एखाद्याच्या अंत्ययात्रेत उधळली जाणार आहे. पण फुलझाडांची काळजी घेणाऱ्या बागवानाला तिचे भविष्य ठरविता येते. यवतमाळातील अशाच काही भाबड्या कळ्यांचा सुगंध आता शिक्षणाचे अत्तर होऊन दरवळणार आहे....
अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वातावरणातून दूर खास वसतिगृहात ठेवण्यात आले. ही सारी धडपड केली अमरावतीच्या बडनेरा येथील प्रकाश चव्हाण यांनी.
स्वत:च्या कमाईतून समाजासाठी काही करून पाहणाºया चव्हाण यांच्या धडपडीची ही कहाणी आहे. आजही समाजात असे काही घटक आहेत, की ज्यांची जिंदगी भटकी आहे. गावोगावी पाल ठोकून चार दिवस राहायचे निघून जायचे. त्यांच्या लेकरांना शिक्षणाचा गंध लाभत नाहीच, पण खुद्द या पालकांनाही शिक्षण महत्त्वाचे वाटत नाही. अशा पालकांच्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून प्रकाश चव्हाण यांनी यवतमाळात त्यांच्यासाठी ‘आम्ही साºया सावित्री’ या नावाने वसतिगृह सुरू केले आहे. वडगाव परिसरातील अशोकनगरातील एका भाड्याच्या घरात हे वसतिगृह आहे. बडनेºयाला ग्रंथालय कर्मचारी असलेले चव्हाण स्वत:च्या पगारातून या घराचे चार हजारांचे दरमहा भाडे अदा करतात. तर येथे लागणारा किराणा व इतर असा मासिक सात ते आठ हजारांचा खर्च लोकवर्गणीतून भागवितात. मुलींना वसतिगृहात ठेवून त्यांना जवळच्याच सावित्रीबाई फुले शाळेत शिकविले जात आहे.
चार मुलींना चेन्नईतून आणले
यवतमाळ नजीकच्या काही बेड्यांवर प्रकाश चव्हाण यांनी मुलींच्या शिक्षणाची स्थिती जाणून घेतली, तेव्हा भयावह चित्र पुढे आले. येथील चार मुलींना त्यांच्याच आईवडिलांनी हैदराबाद, चेन्नई अशा ठिकाणी नेले होते. तेथे पोट भरण्यासाठी या मुली भिक्षा मागत होत्या. त्यांना चेन्नईत गाठण्यात आले. त्यांच्या आईवडिलांना समजावून मुलींना यवतमाळात आणून वसतिगृहात आणि शाळेत दाखल केले.
‘तिचा’ बालविवाह होता-होता टळला
भटक्या कुटुंबांमध्ये आजही बालविवाह होत आहे. त्याचाच फटका यवतमाळ नजीकच्या बेड्यावरील ऋतूजा (बदललेले नाव) बसला होता. ती नववीत असताना आईवडिलांनी तिची शाळा बंद केली आणि विवाह ठरविला. पण तिची शिकण्याची इच्छा होती. तिला ‘आम्ही साऱ्या सावित्री’ वसतिगृहाबद्दल कळले आणि ती तेथे पोहोचली. प्रकाश चव्हाण यांनी तिला दाखल करून घेतले, शाळेतही दहावीत दाखल केले. तर दुसरीकडे तिच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांची मानसिकता बदलली.
पित्याची गुन्हेगारीत ‘तिच्या’ शिक्षणाला बेड्या
यवतमाळलगतच्याच एका बेड्यातील गुन्हेगारी जगात वावरणाऱ्या पित्याच्या पोटी ‘मिनी’चा (बदललेले नाव) जन्म झाला होता. त्यामुळे वडलाच्या कृत्याने तिचे आयुष्य काळवंडले होते. तिला शोधून ‘आम्ही साऱ्या सावित्री’ वसतिगृहाच्या छत्रछायेत सुरक्षित करण्यात आले आहे.
तर त्याच बेड्यावरील दुसरे दाम्पत्य रोजमजुरीसाठी पुण्यात गेले अन् मुलीलाही घेऊन गेले. ती आईवडिलांसोबत भटकत राहिली. तिलाही आता शाळेत दाखल करण्यात आले आहे.

आणखी २५ मुली प्रतीक्षेत
प्रकाश चव्हाण, त्यांचे सहकारी इशू माळवे आणि पपिता माळवे अजूनही विविध बेड्यांवर जाऊन गरजू मुलींचा शोध घेत आहेत. आणखी २५ मुलींची नोंद त्यांनी घेतली आहे. मात्र सध्याच्या भाड्याच्या घरातील वसतिगृहात एवढ्या मुलींना ठेवणे अशक्य आहे. त्यासाठी समाजातून दान मिळण्याची नितांत गरज आहे. भटक्या कुटुंबांमध्ये बालविवाहाचे प्रमाण कायम असल्याने येथील मुलीही बालपणापासूनच कुपोषित असतात. त्यांना शिक्षणासोबतच चांगल्या आहाराची गरज आहे. बेड्यांवरील मुलींची विविध शाळांमध्ये फक्त नाव घेतली जातात, त्या प्रत्यक्ष शाळेत येतात की नाही, याकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंतही प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली.


शिक्षणाच्या अभावामुळे माझ्या चार बहिणींच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. सगळ्यांचे बालविवाह झाल्यामुळे त्या अकाली माता झाल्या. मी काही कारणास्तव माझ्या बहिणींचे आयुष्य नाही दुरुस्त करू शकलो. ती सल आजही मला स्वस्थ झोपू देत नाही. समाजातील काही मुलींचे आयुष्य जर शिक्षणाच्या माध्यमातून दुरुस्त झाले तर जग सोडताना मला दु:ख होणार नाही.
- प्रकाश चव्हाण,
संस्थापक ‘आम्ही साऱ्या सावित्री’
वसतिगृह

Web Title: Finally, the girls got the rights school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा