अखेर मदन येरावार यांच्यासह १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 03:18 PM2019-05-17T15:18:03+5:302019-05-17T15:22:04+5:30

येथील न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Finally, case filed against Madan Yerawar and 17 others for cheating | अखेर मदन येरावार यांच्यासह १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अखेर मदन येरावार यांच्यासह १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देअवधूतवाडी पोलीस ठाणे ११ कोटींच्या भूखंडाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ११ कोटी रुपये किंमतीच्या वादग्रस्त भूखंड खरेदी-विक्री प्रकरणात हा गुन्हा नोंदविला गेला.
येथील आयुषी किरण देशमुख यांनी या प्रकरणी आधी पोलिसात फिर्याद दिली होती. परंतु राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा नोंदविणे टाळले. म्हणून आयुषी यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) राजकिरण इंगळे यांनी या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश १४ मे रोजी जारी केले. मात्र त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी दोन दिवस टाईमपास करून गैरअर्जदारांना स्थगनादेशासाठी संधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुषीने पत्रपरिषद घेऊन या भूखंड प्रकरणाचा भंडाफोड केल्याने व प्रसार माध्यमांनी बातम्या झळकविल्याने पोलिसांवर दबाव वाढला. स्पष्ट आदेश असताना अधिक टाळाटाळ करणे अंगलट येण्याची चिन्हे दिसताच अखेर गुरुवारी रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४२६, ४६५, ४६८, ४७१, ३४ व १२० (ब) कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे हे यात प्रमुख आरोपी आहेत. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. याशिवाय जयश्री ठाकरे, विजश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री उर्फ श्वेता देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चोखाणी, भूमिअभिलेख विभागाचे येथील तत्कालीन उपअधीक्षक, यवतमाळ नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक यात आरोपी बनविण्यात आले आहे. अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर यांनी हा गुन्हा दाखल केला असून तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक जी.के. चौधर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात आता आरोपींची अटक केव्हा होते, याकडे नजरा लागल्या आहेत.

पुरावा नष्ट केल्याचे कलम जोडणार
अवधूतवाडी येथील कोल्हे चाळमध्ये आठ ब्लॉक होते. मात्र खरेदी-विक्री व्यवहारादरम्यान अचानक किरण देशमुख यांचा ब्लॉक गायब करण्यात आला. आठ ऐवजी सात ब्लॉक दाखविले गेले. एवढेच नव्हे तर हे ब्लॉक दिसू नये म्हणून ते बांधकाम पाडून तेथे सपाट जमीन करण्यात आली. या माध्यमातून पुरावा नष्ट करण्यात आला. याच मुद्यावरून आता या १७ जणांविरुद्ध भादंवि २०१ कलमान्वये पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा वाढविला जावा, अशी मागणी न्यायालयात केली जाणार आहे.

चौकशी नव्हे थेट गुन्ह्याचे आदेश
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये प्रकरण न्यायालयात आल्यास सहसा न्यायालय पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देते. परंतु ११ कोटी रुपये किंमतीच्या ९२४१ चौरस फूट जागेच्या या प्रकरणात थेट गुन्हे नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात पालकमंत्र्यांचे नाव नमूद असल्याने न्यायालयाने संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा त्यात याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार तथ्य आढळून आल्याने थेट गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात आले. पोलिसांना आता यात केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव तेवढी करावी लागणार आहे. या प्रकरणाची अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे अवधूतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार आयरे यांनी यापूर्वीच गोळा केली आहेत. एपीआय चौधर यांच्याकडे आता आरोपींची तत्काळ अटक, बयाने नोंदविणे, चार्जशिट बनविणे एवढेच काम शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Finally, case filed against Madan Yerawar and 17 others for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.