काँग्रेसला स्वीकारण्याची तयारी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 09:33 PM2019-05-25T21:33:32+5:302019-05-25T21:35:03+5:30

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.

Congress is not ready to accept | काँग्रेसला स्वीकारण्याची तयारी नाहीच

काँग्रेसला स्वीकारण्याची तयारी नाहीच

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक । २०१४ ला झिडकारले, २०१९ लाही नाकारले, आत्मचिंतनाची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे २०१४ पेक्षाही पानीपत झाले. त्यावेळी मतदारांनी निष्क्रीय काँग्रेसला झिडकारले होते. परंतु गेल्या पाच वर्षात काँग्रेस सक्रियच झाली नाही. त्यामुळे काँग्रेसला स्वीकारण्याची मतदारांची अद्यापही मानसिक तयारी झाली नसल्याचे यावेळच्या निकालावरून दिसून येते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर प्रचंड मरगळ आली होती. त्यातच नरेंद्र मोदींची मोठी व उघड लाट होती. त्यात काँग्रेस भूईसपाट झाली. २०१९ मध्ये नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयामुळे भाजप लोकसभेतील जागांबाबत अर्ध्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात २०१९ मध्ये २०१४ पेक्षाही भाजप आघाडीची कामगिरी सरस राहिली. सलग दहा वर्षासाठी मतदारांनी काँग्रेसला नाकारले. यामागे काँग्रेसची निष्क्रीयता, गटबाजी, मवाळ भूमिका, सत्तेसाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय तडजोडी, विरोधकांशी घरठाव आदी कारणे सांगितली जात आहे. २०१४ च्या पानीपतपासून धडा घेऊन काँग्रेसने गेली पाच वर्ष जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणे, आक्रमक आंदोलने करणे, पक्षबांधणीवर जोर देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात यापैकी काहीही काँग्रेसला साध्य करता आले नाही. काँग्रेसची आंदोलने फोटो-बातमीपुरतीच मर्यादित राहिली. आक्रमकता तर पहायलाच मिळाली नाही. वास्तविक काँग्रेसने आक्रमक भूमिका घ्यावी, जनतेचे प्रश्न सोडवावे, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. काँग्रेसचे नेते वर्चस्व आणि गटातटातच गुंतून राहिले. अखेर व्हायचे तेच झाले. जनतेने या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. किमान आता तरी काँग्रेसचे डोळे उघडते का आणि जनतेच्या प्रश्नावर प्रामाणिक भावनेने काँग्रेसची मंडळी एकजुटीने आंदोलन करते का, समस्या खरोखरच सोडविते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे अपयश आपल्या पथ्यावर पडेल ही काँग्रेसची मानसिकता बदलण्याची प्रतीक्षा आहे.
धानोरकरांच्या आक्रमकतेला पसंती
वरोराचे शिवसेना आमदार सुरेश धानोरकर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये आले आणि खासदार म्हणून विजयी झाले. सर्वत्र काँग्रेस हरली असताना एकटे धानोरकरच विजयाचा चमत्कार कसे करू शकले, याचीच चर्चा रंगते आहे. मुळात मतदारांना जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता भावते. ही आक्रमकता शिवसेनेतील सुरेश धानोरकर यांच्यात मतदारांनी पाहिली आणि त्यांना आक्रमक खासदार म्हणून पसंती दिली, असे मानले जाते.

Web Title: Congress is not ready to accept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.