सातही मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:00 AM2019-09-28T06:00:00+5:302019-09-28T06:00:16+5:30

जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवारीबाबत कुठेच चित्र स्पष्ट नाही. नेहमी चौरंगी किंवा पंचरंगी लढत होणाºया वणी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये प्रचंड ओढाताण सुरू आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यापुढे पक्षातूनच वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आव्हान उभे केले आहे.

Complexity of candidacy in all seven constituencies | सातही मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत

सातही मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : कुठे भाजप, शिवसेना तर कुठे काँग्रेस, राष्ट्रवादीत स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार २७ सप्टेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला असला तरी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात उमेदवार नेमका कोण याची गुंतागुंत प्रमुख चारही पक्षात पहायला मिळते.
२७ सप्टेंबर या नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ४८ व्यक्तींनी ९१ अर्जांची उचल केली. मात्र पितृपक्ष असल्याने हे अर्ज दाखल केले नाही. सोमवारपासून या नामांकनाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असले तरी उमेदवार कोण हे ठरलेले नाही. नेत्यांमध्ये कितीही रस्सीखेच दिसत असली तरी भाजप-शिवसेनेची युती होईल असे मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही निश्चित आहे. या दोन्ही युती, आघाडीमध्ये केवळ वाद हा मतदारसंघावरील दावा, फेरबदल व नेमका उमेदवार कोण याचा आहे.
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवारीबाबत कुठेच चित्र स्पष्ट नाही. नेहमी चौरंगी किंवा पंचरंगी लढत होणाºया वणी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये प्रचंड ओढाताण सुरू आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यापुढे पक्षातूनच वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी आव्हान उभे केले आहे. ही जागा भारतीय जनता युवा मोर्चाने प्रतिष्ठेची केली आहे. त्याच वेळी शिवसेनेनेही एकेकाळी आमचा आमदार असल्याचे सांगत या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ सेनेला न सुटल्यास बंडखोरीची चिन्हे आहेत. विशेष असे शिवसेनेतही दोन गट आहेत. युतीमध्ये एक गट भाजपासोबत असल्यास दुसरा विरोधात जाण्याची शक्यता आहे. वणी मतदारसंघ काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. ते संजय देरकर यांच्यासाठी उमेदवारी मागत आहेत. त्याच वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा वणीची एकमेव जागा मित्र डॉ. महेंद्र लोढा यांच्यासाठी मागितली आहे. ते पाहता वणीची जागा काँग्रेसला सुटेल की राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सुटली तर उमेदवार संजय देरकर की माजी आमदार वामनराव कासावार याबाबत संभ्रम आहे.
आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे परंपरागत उमेदवार आहेत. परंतु यावेळी गोंड समाजाच्या ८५ हजार मतांचा आकडा पुढे करून मोघेंच्या उमेदवारीला पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. वीज निर्मिती कंपनीचे नुकतेच राजीनामा दिलेले उपमुख्य अभियंता मनोहर मसराम, रितेश परचाके यांची नावे काँग्रेसकडून घेतली जात आहे. लोकसभेत भाजपला ५८ हजार मतांची आघाडी मिळवून देणारे आमदार राजू तोडसाम यावेळीही प्रबळ दावेदार आहेत. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता खुद्द भाजपात वर्तविली जात आहे. तेथे चेहरा बदलविण्याची मागणी भाजपला मदत करणाऱ्या किशोर तिवारी व माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. ऐनवेळी नवा चेहरा तेथे दिला जाई शकतो.
राळेगाव विधानसभा मतदारसंघात आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके भाजपचे उमेदवार निश्चित आहे. मात्र त्यांच्यापुढे वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांचे बंड रोखण्याचे आव्हान आहे. मडावींना राळेगाव नगरपंचायत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पाठबळ दिले जात आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री प्रा. वसंत पुरके पुन्हा उमेदवार होऊ शकतात. परंतु त्यांना पक्षातीलच काही तरुणांनी आव्हान दिले आहे. हे तरुण थेट दिल्लीत संपर्क साधून आहेत.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री मदन येरावार हे भाजपचे उमेदवार निश्चित आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचे नाव टॉपवर आहे. त्यांच्याशिवाय काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख व अन्य काही सक्रिय चेहरे उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. या मतदारसंघात शिवसेनेकडून बंडखोरी होण्याची चिन्हेही दिसू लागली आहे. त्याचवेळी या संभाव्य बंडखोराचे रिमोट कुणाच्या हाती तर नाही ना याचीही चर्चा होत आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने यांच्यापुढे पक्षाचे नगराध्यक्ष ससाने यांनी आव्हान उभे केले आहे. याशिवाय शिवसेनेचाही या मतदारसंघावर जोरदार दावा आहे. सेनेला हा मतदारसंघ न सुटल्यास बंडखोरी होण्याचीही दाट शक्यता आहे. त्याचवेळी रिपाइंच्या आठवले गटानेही जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मानकर यांच्यासाठी उमरखेड मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. रिपाइंने विदर्भातील विधानसभेची ही एकमेव जागा मागितली आहे. ते पाहता उमरखेडच्या एका जागेसाठी आता भाजपसोबतच शिवसेना व रिपाइंमध्येही जोरदार रस्सीखेच पहायला मिळते आहे.

पुसदची निवडणूक ठरणार जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी
पुसद विधानसभा मतदारसंघ या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. कारण भाजपचे विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांनी स्वत: निवडणूक आखाड्यात उतरण्याची घोषणा केली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने आमदार मनोहरराव नाईकांच्या दोन मुलांपैकी नेमका कोण उमेदवार बनतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. युतीच्या जागा वाटपात पुसद मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. आमदार नीलय नाईक खरोखरच लढण्यास इच्छुक असतील तर हा मतदारसंघ भाजपला व उमरखेड शिवसेनेसाठी अदलाबदल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार मनोहरराव नाईकांच्या कुटुंबातील दावेदार राष्ट्रवादीचे उमेदवार बनते की पक्षांतर घडते याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहणार
प्रमुख पक्ष उमेदवारी जाहीर करण्यास आणखी किती वेळ घेईल याकडे नजरा लागल्या आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवण्याचा प्रयत्न दिसतो आहे. मात्र ही संभाव्य खेळी ओळखून इच्छुकांनीही वेळप्रसंगी पक्षांतर करण्याची व अपक्ष नामांकन दाखल करण्याची तयारी व्युहरचना केली आहे.

Web Title: Complexity of candidacy in all seven constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.