बोगस सोयाबीनच्या नऊ हजारांवर तक्रारी, गुन्हे मात्र दोनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 02:49 PM2020-07-08T14:49:52+5:302020-07-08T14:52:41+5:30

अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले.

Complaints on 9,000 bogus soybeans, only two crimes! | बोगस सोयाबीनच्या नऊ हजारांवर तक्रारी, गुन्हे मात्र दोनच !

बोगस सोयाबीनच्या नऊ हजारांवर तक्रारी, गुन्हे मात्र दोनच !

Next
ठळक मुद्देसर्वाधिक तक्रारी यवतमाळातकंपन्यांची मुजोरी, प्रमुख वितरकांविरुद्ध शेतकऱ्यांचा रोष कायम

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदाच्या हंगामात उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी मारले. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले. ते पाहता बियाणे कंपन्यांना कृषी विभाग पाठीशी तर घालत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे १४ लाख हेक्टर क्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन ४० ते ५० रुपये किलोने विकला. सोयाबीनचे बियाणे मात्र ८० ते ९० रुपये किलो दराने शेतकऱ्यांना खरेदी करावे लागले. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी दाग-दागिना मोडून, उसनवारी करून पैशाची तजवीज केली व नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी केली. परंतु प्रत्यक्षात हे महागडे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक झाली. आता शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. या उलट काही शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरले आणि ते उगवलेसुद्धा. त्यामुळे कंपन्यांच्या बियाण्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

कृषी केंद्रांना हवे पोलीस संरक्षण
सोयाबीनचे पेरलेले बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये धडक दिली. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण मागण्याची वेळ आली.

तक्रारींचे ६५ टक्के पंचनामे उरकले
शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बोगस बियाण्यांबाबत तक्रारींचा सपाटा लावला आहे. अमरावती विभागात गत आठवड्यापर्यंत नऊ हजार ३८० तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. हा आकडा दहा हजारांवर जाणार आहे. त्यातील सर्वाधिक ४ हजार ७४९ तक्रारी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. विभागात या तक्रारींचे ६० टक्के पंचनामे उरकण्यात आले आहे.

कृषिमंत्र्यांचे आदेश, पण गुन्हे नाममात्र
बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीने एक तर शेतकऱ्यांना बियाणे बदलवून द्यावे किंवा दोन दिवसात नुकसानभरपाई द्यावी असे आदेश कृषी मंत्र्यांनी जारी केले होते. जी बियाणे कंपनी या तडजोडीला तयार नसेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले गेले होते.

केवळ बुलडाणा, वाशिममध्ये गुन्हा
अमरावती विभागात आतापर्यंत केवळ बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड विरुद्ध तर वाशिम जिल्ह्यात ईगल कंपनीविरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा नोंदविला गेला. नऊ हजार तक्रारी आणि दोनच गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

शेतकऱ्यांना तत्काळ बियाणे बदलवून मिळावे, खरिपाचा हंगाम निघून जावू नये, शेतकºयाचे नुकसान होऊ नये हा प्रयत्न आहे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवली जावू शकते.
- सुभाष नागरे
सहसंचालक (कृषी), अमरावती

Web Title: Complaints on 9,000 bogus soybeans, only two crimes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती