भीतीच्या पिंजऱ्यातून शाळेच्या नभात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:02+5:30

ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा नव्या उल्हासाने सुरू करण्यात आले. कोरोनाची भीती पालकांच्या मनात असली तरी मुला-मुलींच्या मनात मात्र शाळेत जाण्याची ओढ जास्त जाणवली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत अपेक्षित उपस्थिती पाहायला मिळाली. 

From the cage of fear to the sky of the school | भीतीच्या पिंजऱ्यातून शाळेच्या नभात भरारी

भीतीच्या पिंजऱ्यातून शाळेच्या नभात भरारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिनोन्‌महिने पिंजऱ्यात कोंडलेल्या पाखरांना सोमवारी मुक्त आकाशात भरारी घेण्याची संधी मिळाली. दीड वर्ष कोरोनाच्या भीतीपायी घरातच दडून बसलेल्या चिमुकल्यांना अखेर शाळेच्या आवारात सवंगड्यांसोबत शिकण्यासोबतच दंगामस्ती, हल्लागुल्ला करायला मिळाला. सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या. 
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा नव्या उल्हासाने सुरू करण्यात आले. कोरोनाची भीती पालकांच्या मनात असली तरी मुला-मुलींच्या मनात मात्र शाळेत जाण्याची ओढ जास्त जाणवली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत अपेक्षित उपस्थिती पाहायला मिळाली. 
तब्बल दीड वर्ष बंद असलेले वर्ग स्वच्छ करून तेथे पुन्हा एकदा आनंददायक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी आवडीने स्वीकारले होते. तर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्तणुकीसंदर्भातील घातलेले नियम तंतोतंत पाळले गेले. 
जवळपास प्रत्येक शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे दारावरच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर एका बाजूला मांडलेल्या टेबलपुढे प्रत्येक विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करण्यात आली. त्यासाठी दोन-दोन शिक्षकांकडे जबाबदारी सोपविली गेली. ज्यांनी घरून मास्क आणले नाही, त्यांना शाळेतून मास्क पुरविण्यात आले. मास्क सोबतच जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमध्ये नवी कोरी पाठ्यपुस्तकेही वाटप करण्यात आली. तर उत्साही असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशही शिवून आणून दिले. फुलांसह मुलांजवळ सॅनिटायझरचाही सुगंध दरवळला. 

शिक्षण विभागासह सीईओही दिवसभर शाळांच्या दौऱ्यावर  
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार असल्याने सोमवारी शिक्षण विभाग अलर्ट होता. जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी व दीपक चवणे, शिक्षण निरीक्षक योगेश डाफ, उपशिक्षणाधिकाऱ्यांसह सोळाही पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख अशी संपूर्ण पर्यवेक्षकीय यंत्रणा शाळा भेटी करीत दिवसभर दौऱ्यावर होती. या संपूर्ण शाळा भेटींवर सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांची नजर होती. सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी तुपटाकळी, तळेगाव, पांढरकवडासह दिग्रस, उमरखेडच्या शाळांना भेटी दिल्या. 

कुठे गाणी-गप्पा तर कुठे कोळी नृत्य... पुस्तकांसह सायकलही 
- पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर शाळेत पाऊल ठेवताच बच्चे कंपनीही आनंदाने हरखून गेली. पहिला दिवस असल्याने पुस्तकी अभ्यासापेक्षा गोष्टी, गाणी यातून अध्यापनाला सुरुवात झाली. एकमेकांना फूल वाटप करण्यात आले. तर सुकळीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करून पहिला दिवस साजरा केला. यवतमाळ नगरपालिकेच्या शाळांमध्ये पुस्तक वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. पांढरकवडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकल वाटप करण्यात आल्या. 

 

Web Title: From the cage of fear to the sky of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.