बँक एटीएमची सुरक्षा आऊट सोर्सिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:07+5:30

पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम फोडून २८ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली होती. हा गुन्हा पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. उत्तरप्रदेशातील टोळीला अटक केली. या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक वास्तव हाती लागले. बँकांकडून एटीएममध्ये ठेवली जाणारी लाखो रुपयांची रोकड अगदीच बेवारस असते.

Bank ATM's security on outsourcing | बँक एटीएमची सुरक्षा आऊट सोर्सिंगवर

बँक एटीएमची सुरक्षा आऊट सोर्सिंगवर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १९३ एटीएम : एजंसीकडून सुरक्षेच्या खर्चाला कात्री, उपाय तोकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात विविध बँकांचे एटीएम आहेत. जवळपास १९३ एटीएम बँकांनी ग्राहकांच्या सेवेत उघडले आहेत. एटीएमचा संपूर्ण कारभार सर्वच प्रमुख बँकांकडून आऊट सोर्सिंगद्वारे चालविला जातो. केवळ रोकड भरण्यापुरताच बँकेचा संबंध एटीएमशी येतो. आऊट सोर्सिंगवर एटीएमची देखभाल व इतर सुविधा देणाऱ्या एजंसीकडून सुरक्षेच्या खर्चाला कात्री लावली जाते. याचाच फायदा थेट चोरट्यांना होत आहे. अनेकदा शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी एटीएम फोडण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले.
पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम फोडून २८ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली होती. हा गुन्हा पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. उत्तरप्रदेशातील टोळीला अटक केली. या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक वास्तव हाती लागले. बँकांकडून एटीएममध्ये ठेवली जाणारी लाखो रुपयांची रोकड अगदीच बेवारस असते. जिल्ह्यातील बहुतांश बँकांनी ईपीएस, ब्रिंग्स, सीएमएस या सारख्या अनेक एजंसीजकडे एटीएमची जबाबदारी सोपविली आहे. सर्वाधिक ६८ एटीएम ईपीएस एजंसीकडे आहे. या एजंसींनी त्यांच्या हाताखाली आणखी काही एजंसीची सेवा घेतली आहे. यात रायटर सेफ गार्ड, लॉजी कॅच या सारख्या एजंसीज रोख रक्कम एटीएममध्ये भरण्याचे काम करतात.
प्रत्यक्षात एटीएमवर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असणे आवश्यक आहे. बँकांकडून आऊट सोर्सिंग करताना तसा करारही केला जातो. शहरातीलच काय निर्जनस्थळी असलेल्या एटीएमजवळही सुरक्षा रक्षक अपवादानेच पहायला मिळतो. केवळ सीसीटीव्ही कॅमेरे व काही ठिकाणी अलार्म सिस्टीम लावलेली असते. या व्यतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच उपाययोजना केली जात नाही. याचाच फायदा चोरटे घेतात. बँकांचा पैसा असला तरी ती राष्ट्रीय संपत्ती आहे. लाखो रुपयांची रक्कम बेवारसरीत्या एटीएममध्ये ठेवली जात असल्याचे वास्तव पोलीस तपासात उघड झाले.

पूर्णवेळ चौकीदार, अलार्म सिस्टीम आवश्यक
यवतमाळ शहरातील वर्दळीच्या भागात असलेले एटीएम फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. सुदैवाने त्यात चोरट्यांना यश आले नाही. एटीएम सुविधेसाठी बँका ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करतात. मात्र त्याच ग्राहकाच्या पैशाची सुरक्षा करण्याकडे अप्रत्यक्षरीत्या बँकांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. बँकांनी एटीएमच्या ठिकाणी पूर्णवेळ चौकीदार, अलार्म सिस्टम बसविणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चोरी किंवा इतर घटना घडल्यानंतर पोलिसांवरच त्याचा दबाव आणला जातो. प्रत्यक्षात प्रतिबंधासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. याबाबत पोलीस प्रशासनाने ग्राहकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.

Web Title: Bank ATM's security on outsourcing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम