पुसदला नाईकांची अनुपस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:00 AM2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:04+5:30

पुसदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहोटे, तालुकाध्यक्ष भगवान आसोले यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले गेले. या निवेदनावर आमदार मनोहरराव नाईक यांची पहिल्याच क्रमांकावर स्वाक्षरी आहे. मात्र निवेदन देताना ते अनुपस्थित असल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले.

Absence of Pusad Naik, Whispers in NCP | पुसदला नाईकांची अनुपस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुजबुज

पुसदला नाईकांची अनुपस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुजबुज

Next
ठळक मुद्देनिवेदनावर केवळ स्वाक्षरी : शरद पवारांवरील कारवाईचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे सांगत जिल्ह्यात गुरुवारी राष्ट्रवादीने सर्वत्र मागण्यांचे निवेदन सादर करून निषेध नोंदविला. मात्र राष्ट्रवादीच्या या आंदोलनात सर्वांच्या नजरा पुसद विधानसभा मतदारसंघावर लागल्या होत्या. निवेदन देताना राष्ट्रवादीचे आमदार मनोहरराव नाईक अथवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही सदस्य उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नाईकांची नाराजी कायम असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
पुसदमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहोटे, तालुकाध्यक्ष भगवान आसोले यांच्या नेतृत्वात मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले गेले. या निवेदनावर आमदार मनोहरराव नाईक यांची पहिल्याच क्रमांकावर स्वाक्षरी आहे. मात्र निवेदन देताना ते अनुपस्थित असल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले. पुसदचे नगराध्यक्षपद अनिताताई नाईक यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आजाराच्या मुद्यावरून आमदार नाईक व नगराध्यक्ष अनिताताई नाईक निवेदन देण्यासाठी उपस्थित राहू शकले नसल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जाते. मात्र आमदार होण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले इंद्रनील नाईक अथवा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक हे ‘तरुण’सुद्धा उपस्थित न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. यातूनच संभाव्य पक्षांतराची धग कायम तर नाही ना याची चर्चा होत आहे.

आर्णी राष्ट्रवादीत पक्षांतराची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांचा गृहतालुका असलेल्या आर्णीमध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेत खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. पाच जणांनी पक्षांतराच्या दृष्टीने भाजप नेत्याशी बैठक व चर्चा केल्याचेही सांगितले जाते. संख्याबळामुळे या इच्छुकांवर पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होणार नाही, हे विशेष.

Web Title: Absence of Pusad Naik, Whispers in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.