14 thousand homeguards to support the police of Maharashtra | महाराष्ट्र पोलिसांच्या दिमतीला १४ हजार होमगार्ड
महाराष्ट्र पोलिसांच्या दिमतीला १४ हजार होमगार्ड

ठळक मुद्देकायमस्वरूपी उपलब्धीनिवडणूक, सण-उत्सवाच्या बंदोबस्तात होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी दिलासा देत कायमस्वरूपी गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण १४ हजार ३४० होमगार्डची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ११ हजार १०० होमगार्ड प्रत्यक्ष उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय होमगार्डची संख्या निश्चित करून देण्यात आली आहे. त्यात यवतमाळ ४४०, बुलडाणा ५००, वाशिम १७०, अकोला ४४०, अमरावती ग्रामीण २९०, अमरावती शहर २४०, नांदेड व लातूर ५२०, हिंगोली २९०, परभणी २००, गोंदिया २८०, गडचिरोली २६०, भंडारा ३१०, चंद्रपूर ४२०, वर्धा ४००, नागपूर ग्रामीण १७०, नागपूर शहर २८०, जालना २५०, उस्मानाबाद ३७०, बिड ४००, औरंगाबाद ग्रामीण ३९०, औरंगाबाद शहर २४०, सोलापूर ग्रामीण ४००, सोलापूर शहर २४०, सांगली ५८०, सातारा ६४०, कोल्हापूर ७८०, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण प्रत्येकी ५००, अहमदनगर २९०, जळगाव ८५०, नंदूरबार ३३०, धुळे ३१०, नाशिक शहर व ग्रामीण प्रत्येकी ४४०, सिंधुदुर्ग १४०, रत्नागिरी १८० तर रायगड जिल्ह्याला ३४० होमगार्डची संख्या ठरवून देण्यात आली आहे. प्रत्यक्ष उपलब्ध करून देताना यात काही प्रमाणात कपात केली जाणार आहे. होमगार्डच्या समादेशकांना सर्व जिल्ह्यांना होमगार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश १३ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आले आहे.
दोन महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. याच काळात गणेशोत्सव, दुर्गोत्सव व अन्य सण-उत्सव राहणार आहे. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याला मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. मात्र प्रत्यक्षात मनुष्यबळाची टंचाई आहे. यावर उपाय म्हणून जिल्हानिहाय कायमस्वरूपी होमगार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पोलीस भरतीची प्रतीक्षाच
महाराष्ट्र पोलीस मनुष्यबळाच्या कमतरतेला तोंड देत असले तरी अद्यापही पोलीस भरतीचा मुहूर्त महासंचालक कार्यालयाला सापडलेला नाही. ‘आधी लेखी परीक्षा व नंतर शारीरिक क्षमता चाचणी’ असे पोलीस भरतीचे नवे स्वरूप यावेळी राहणार आहे. त्या अनुषंगाने तरुणाई अभ्यासाला व मैदानावर तयारीला लागली आहे. परंतु पोलीस भरती नेमकी केव्हा होणार, किती जागांची होणार याबाबत काहीच स्पष्ट नसल्याने या तरुणांचे परिश्रम व्यर्थ ठरत आहे. हजारो तरुणांना या भरतीची प्रतीक्षा आहे.


Web Title: 14 thousand homeguards to support the police of Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.