आरोग्य विम्याचा प्रीमियम कमी करायचाय? टेन्शन नॉट, करा 'या' गोष्टी
पुढील काळात उपचारावरील खर्च अधिकच वाढण्याची शक्यता असल्याने चांगली आरोग्य विमा पॉलिसी गरजेची आहे.
भारताचा आरोग्य महागाई दर सध्या सुमारे १४% आहे. पुढील काळात उपचारावरील खर्च अधिकच वाढण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली आरोग्य विमा पॉलिसी गरजेची आहे.
वाढत्या वयानुसार प्रीमियम वाढत जातो. प्रीमियम कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना पुढील ५ गोष्टी कराव्यात.
कमी वयात पॉलिसी घ्यावी, कारण तेव्हा प्रीमियम कमीच असतो. यात संचित बोनस व कमी दराचा फायदा मिळतो. कंपन्या जुने ग्राहक असल्याने अधिक संरक्षण आणि फायदे देतात.
ज्येष्ठ नागरिकांनी फॅमिली फ्लोटर प्लानचा विचार करावा. यात संपूर्ण कुटुंब एकाच पॉलिसीखाली येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमागे प्रीमियम कमीच येतो. शिवाय अधिक सवलती मिळतात.
डिडक्टिबल म्हणजे विमा लागू होण्यापूर्वी स्वतः भरावयाची ठराविक रक्कम मोठी भरल्यास एकूण प्रीमियम कमी होत असतो. वार्षिक आरोग्य तपासणी, फिटनेस प्रोग्रॅम्समध्ये भाग घेतल्यास प्रीमियम सवलती मिळतात.
काही विमा कंपन्या चालण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे किंवा योग्य बीएमआय राखण्यावरही सवलती देतात. सुपर टॉप-अप योजना ज्येष्ठांना कमी खर्चिक पण अधिक संरक्षण देणारी ठरते.
उदाहरणार्थ, पंतप्रधान जन आरोग्य योजना ५ लाखांपर्यंत खर्च भागवते व उर्वरित १० लाख सुपर टॉप-अप प्लान कव्हर करू शकतो. जर प्राथमिक विम्याची रक्कम संपली, तर सुपर टॉप-अप उर्वरित खर्च उचलतो, त्यामुळे ही योजना फायदेशीर ठरते.