जिओ सिनेमावरील ‘फ्री’चे अच्छे दिन संपणार, आता पैसे भरायची ठेवा तयारी
आयपीएल संपेपर्यंत कंपनी पैसे आकारण्यास सुरू करणार आहे.
जिओ सिनेमा रिलायन्स इंडस्ट्रीजचा OTT प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांच्याकडे इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) प्रसारणाचे डिजिटल अधिकार आहेत.
आतापर्यंत यावर मोफत कंटेट पाहता येत होता. पण पुढील काही दिवसात यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. जिओ सिनेमा आयपीएलच्या अखेरीस हे सुरू करण्याची तयारी करत आहे.
अनेक वर्षांची सबस्क्रिप्शनची प्रथा मोडून मुकेश अंबानींनी जिओ सिनेमावर IPL मोफत दाखवण्याची ऑफर दिली होती. त्यातून त्यांनी विक्रमी व्ह्यूज मिळवले आहेत.
जिओ सिनेमाच्या विस्तारानंतर त्यावर शुल्क आकारण्यास सुरूवात केली जाईल अशी माहिती रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट व्यवसायाच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत म्हटल्याचं ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
किमतीबाबत अद्याप रणनीती ठरलेली नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल. पुढील महिन्यात आयपीएल संपण्यापूर्वी नवीन टायटल्स सादर केली जातील. तोपर्यंत विनामूल्य सामने पाहू शकतील, असंही त्यांनी सांगितलं.
IPL नंतर Jio सिनेमावर सबस्क्रिप्शन चार्ज लागू केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, चित्रपट किंवा टीव्ही मालिका पाहण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावं लागू शकतं.
मुकेश अंबानी या प्लॅटफॉर्मला ग्लोबल मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग जायंट बनण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
इंटरनेटच्या वाढत्या ॲक्सेसमुळे प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. एप्रिलमध्ये IPL च्या सुरूवाकीलाच लाँच करताना जिओ सिनेमाला १.४७ बिलियन पेक्षा अधिक व्हिडीओ व्ह्यूज मिळाले.
विस्तारानंतर जिओ सिनेमावर पैसे आकारण्याची योजना आहे, परंतु ग्राहकांसाठी किमान शुल्क आकारले जाईल, असंही देशपांडे म्हणाल्या.