PM विश्वकर्मा योजना: 15 हजारांची मदत अन् कमी व्याजदरात कर्ज, पाहा...
PM Vishwakarma scheme: 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 'पीएम विश्वकर्मा' योजना लॉन्च करणार आहेत.
केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 13,000 कोटी रुपये खर्च करेल. या योजनेच्या कक्षेत येणाऱ्या लोकांना 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, 5 टक्के व्याजदरावर 1 लाख रुपये(पहिला हप्ता) आणि 2 लाख रुपये (दुसरा हप्ता) कर्ज दिले जाईल.
पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्माची ओळख पटवली जाईल. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत 18 पारंपारिक कारागिरांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये सुतार, लोहार, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, मजूर, गवंडी, टोपली/चटई/झाडू बनवणारे, खेळणी बनवणारे (पारंपारिक), न्हावी, धोबी, शिंपी इत्यादींचा समावेश आहे.
पीएम विश्वकर्मा अधिकृत वेबसाइटनुसार, आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार, मोबाइल नंबर, बँक तपशील, रेशन कार्ड अनिवार्य आहे. याद्वारेच तुम्ही नोंदणी करू शकता.
एखाद्या लाभार्थ्याकडे शिधापत्रिका नसेल, तर त्याला कुटुंबातील सर्व सदस्यांची आधारकार्डे द्यावी लागतील. लाभार्थ्यांचे बँक खाते नसल्यास त्यांना प्रथम बँक खाते उघडावे लागेल.
वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, बिगर बँकिंग वित्त कंपन्या आणि सूक्ष्म वित्त संस्था या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास पात्र आहेत.
तुम्ही या योजनेच्या कक्षेत असल्यास, तुम्ही https://pmvishwakarma.gov.in किंवा नोंदणीकृत कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे अर्ज करू शकता.