IPL 2025 हंगामा आधी बदलले मॅचचे शेड्युल! हे नवे नियमही झाले लागू
इथं जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती
आयपीएलच्या १८ व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या स्पर्धेत काही नवे नियम लागू करण्यात आले आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
कोरोनाच्या काळात क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांवर एक मोठं संकट ओढावले. चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. आयपीएल स्पर्धेसाठी ही बंदी हटवण्यात आली असून त्यामुळे गोलंदाजांसाठी चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा फंडा वापरणं शक्य होणार आहे.
ज्या नियमामुळे हार्दिक पांड्या CSK विरुद्धच्या लढतीला मुकणार आहे तो नियम बदलण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आता कर्णधाराला आता एका सामन्याच्या बंदीच्या कारवाईचा सामना करावा लागणार नाही.
स्लो ओव्हर रेट नियम शिथील करण्यात आला असून आता कर्णधाराच्या खात्यात डेमेरिट पॉइंट जमा होतील. अधिक डेमेरिट पॉइंट जमा झाले तरच कर्णधारावर बंदीची कारवाई होईल.
रात्रीच्या वेळी ११ व्या षटकानंतर आता नवा चेंडू वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. दव पडल्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. दिवसा खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात हा नियम लागू नसेल.
आयपीएलमध्ये लागू करण्यात आलेले नवे नियम भविष्यात आयसीसीही आंतरारष्ट्रीय सामन्यात लागू करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
नव्या नियमांशिवाय आयपीएलच्या एका सामन्यात वेळापत्रकातही बदल करण्याची वेळही आलीये. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील ६ एप्रिल रोजी रंगणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात खेळवण्यात येणार होता. पण राम नवमीमुळे हा सामना आता गुवाहाटीच्या मैदानात खेळवला जाईल.