भारतीय लोक बचतीत मागे अन् खर्चात पुढे; RBI ने व्यक्त केली चिंता
भारतीयांची कमाई वाढली आहे, पण खर्चातही वाढ झाली आहे. अनेकजण कर्ज काढून गरजा पुर्ण करत आहेत.
एखाद्या देशाचे उत्पन्न वाढले की कमी झाले, हे मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न मोजले जाते. म्हणजेच, त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न किती आहे, त्यावरुन देशाचे उत्पन्न ठरवले जाते.
आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. पण, चिंतेची बाब म्हणजे कमाई वाढूनही लोकांच्या हातात पैसा उरत नाहीये. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कौटुंबिक मालमत्ता आणि दायित्वांवरील (हाउसहोल्ड असेट आणि लायबिलिटीज) ताज्या रिपोर्टनुसार, भारतीयांची बचत 50 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर गेली आहे.
त्यामुळेच देशातील जनता कर्जाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. बचत विसरुन लोक आपले छंद आणि गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेत आहेत. आकडेवारीनुसार, 2022-23 दरम्यान भारतीयांची बचत 5.1 टक्क्यांवर घसरली आहे.
अहवालानुसार, भारताच्या जीडीपीच्या दृष्टीने बचतीचे आकडे बघितले तर निव्वळ बचत जवळपास 13 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरली आहे. हा आकडा गेल्या 50 वर्षांतील सर्वात कमी आहे.
लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे का? तर नाही. पण, आरबीआयच्या अहवालानुसार यामागे महागाई, हेही महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या महागाईमुळे लोकांना बचत करता येत नाही. उलट ते आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेत आहेत.
लोकांची गरजा वाढत आहेत, त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही लोक कर्जाचा सहारा घेऊ लागले आहेत. 2021-22 मध्ये आर्थिक दायित्व केवळ 3.8 टक्के होते. जे 2022-23 मध्ये 5.8 टक्के झाले आहे.
आजच्या युगात जमीन, घर, दुकान इत्यादी खरेदी करण्यासाठी लोक कर्ज घेत आहेत. याशिवाय लोक लग्नसोहळा आणि अगदी हनिमूनसारख्या लक्झरी कारणांसाठीही कर्ज काढत आहेत.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. मात्र उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ होणे ही चिंतेची बाब आहे.
आकडेवारीनुसार, भारताचे दरडोई उत्पन्न 2011-12 च्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले आहे. 2014-15 मध्ये भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न अंदाजे 72,805 रुपये होते, जे 2022-23 मध्ये वाढून 98,374 रुपये झाले आहे.