भारतामध्ये असं एक ठिकाण आहे जिथे चक्क श्वानांची पूजा केली जाते
देवी-देवतांचे मंदिरे आपण सगळ्यांनीच पाहिली आहेत. इतकंच कशाला आपण नित्यनियमाने देवाची पूजाही करतो. परंतु,श्वानाचंही मंदिर असतं हे तुम्हाला माहितीये का?
हो. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. आपल्या देशात असं एक ठिकाण आहे जिथे चक्क श्वानाचं मंदिर आहे. आणि, लोक त्या श्वानांची पूजाही करतात.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात चन्नापटना येथे श्वानांचं मोठं मंदिर असून त्या देवळात पूजाही केली जाते.
चन्नापटना डॉग टेंपल हे अग्रहार वलागेरहल्ली या छोट्याश्या गावात आहे. हे मंदिर 'नई देवस्थान' या नावाने ओळखलं जातं. कन्नड भाषेत नाई म्हणजे श्वान.
२०१० मध्ये रमेश नावाच्या एका व्यापाऱ्याने हे मंदिर स्थापन केल्याचं म्हटलं जातं.विशेष म्हणजे या गावात वर्षातून एकदा नई देवस्थानच्या नावाने जत्राही भरवली जाते.
येथे येणारे भाविक प्रथम श्वानाला नमस्कार करतात. त्यानंतरच ते केम्पम्मा देवीचं दर्शन घेतात. ज्यावेळी केम्पप्पा देवीच्या मंदिराचं काम सुरु होतं त्यावेळी तेथे दोन कुत्रे राहत होते.
मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर ते कुत्रे अचानक गायब झाले. याचवेळी एका गावकऱ्याच्या स्वप्नात देवीने दर्शन देऊन त्या कुत्र्यांना परत आणायला सांगितलं.
प्रयत्न करुनही ते श्वान न सापडल्यामुळे गावकऱ्यांनी त्या श्वानांचं मंदिर बांधायचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अग्रहार वलागेरहल्ली या गावात चन्नापटना डॉग टेंपल पाहायला मिळतं.