'TRAI'ने उचलले मोठे पाऊल! स्पॅम कॉल करणारे २.७५ लाख नंबर होणार बंद
TRAI ने सांगितले की, गेल्या दोन आठवड्यात, एक्सेस पुरवठादारांनी ५० एंटटीजना ब्लॉक केले आहे.
याशिवाय सर्व्हीस देणाऱ्यांनी २,७५,००० SIP, DID, मोबाईल नंबर डिस्कनेक्ट केले आहेत. या सर्वांवर TCCCPR-2018 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
स्पॅम कॉल्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे ट्रायने नुकतेच सांगितले होते. २०२४ च्या पहिल्या सहामाहीत, नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटरकडून ७.९ लाख तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यानंतर ट्रायने १३ ऑगस्ट २०२४ रोजी कडक सूचना जारी केल्या. यामध्ये ॲक्सेस प्रोव्हायडर्सना नोंदणी नसलेल्या कॉलर्सकडून करण्यात येणाऱ्या प्रमोशनल कॉल्सवर बंदी घालण्यास सांगण्यात आले होते.
अशा टेलीमार्केटर्सना दंड आकारण्याबरोबरच त्यांना दोन वर्षांपर्यंत डिस्कनेक्ट किंवा काळ्या यादीत टाकावे, TRAI ने असे निर्देश दिले.
याव्यतिरिक्त, TRAI ने २८ ऑगस्ट २०२४ रोजी अँटी-स्पॅम नियमन संदर्भात एक सल्लापत्र देखील जारी केले. वाढत्या स्पॅम कॉल्सला आळा घालण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
या अंतर्गत, ट्रायने सांगितले की, ठराविक संख्येपेक्षा जास्त कॉल किंवा टेक्स्ट पाठवण्यावर शुल्क असावे. तसेच, नियम मोडल्यास दंडही व्हायला हवा.
या सल्लापत्रापूर्वी २७ ऑगस्ट रोजी संयुक्त समितीची ट्रायने बैठक घेतली.
या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयआरडीए, ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि दूरसंचार विभागातील लोक सहभागी झाले होते.