दुचाकींना टोल टॅक्स का लागत नाही? यामागे आहेत 'ही' ५ महत्त्वाची कारणे
तुम्ही कधी विचार केला आहे का....
आपण अनेकदा महामार्गांवरुन प्रवास करताना पाहतो की चारचाकी, ट्रक किंवा बससारख्या मोठ्या वाहनांकडून टोल नाक्यांवर टॅक्स वसूल केला जातो.
मात्र, दुचाकीस्वारांना यातून सूट देण्यात आली आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, की दुचाकींना टोल टॅक्स का भरावा लागत नाही?
टोल टॅक्सची आकारणी वाहनाच्या आकारमानावर आणि त्याने रस्त्यावर होणाऱ्या परिणामांवर अवलंबून असते. दुचाकी, जसे की मोटरसायकल किंवा स्कूटर, कार किंवा ट्रकच्या तुलनेत रस्त्यावर खूप कमी जागा व्यापतात.
तसेच, त्यांचे वजनही नगण्य असते. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामावर आणि देखभालीवर त्यांचा भार कमी पडतो. याच कारणामुळे टोल आकारणीच्या नियमांत त्यांना सूट देण्यात आली आहे.
टोल रोड हे प्रामुख्याने लांबच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले असतात. दुचाकीस्वारांचा वापर स्थानिक असल्याने त्यांना टोलमधून वगळण्यात आले आहे.
महामार्गांचा वापर बऱ्याचदा व्यावसायिक वाहतुकीसाठी केला जातो, जिथे ट्रक आणि मोठ्या गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात सामान वाहून नेले जाते. या वाहनांमुळे रस्त्यांची झीज जास्त होते.
याउलट, दुचाकीवर जास्त सामान वाहून नेण्याची क्षमता नसते. त्यामुळे रस्त्याच्या पायाभूत सुविधांवर त्यांचा फारसा परिणाम होत नाही.
भारतातील दुचाकींची संख्या प्रचंड आहे. जर प्रत्येक दुचाकीस्वाराकडून टोल वसूल करायचा ठरवले, तर टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतील.
यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वेळ आणि इंधनाचा अपव्यय होईल. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि अव्यवहार्य ठरू शकते.
दुचाकी हे सामान्य माणसाचे वाहन मानले जाते. अनेकजण दैनंदिन कामासाठी किंवा रोजगारासाठी तिचा वापर करतात. त्यांच्यावर अतिरिक्त टोलचा बोजा टाकल्यास त्यांच्या मासिक खर्चावर परिणाम होऊ शकतो.