चिंतेचा एक प्रकार असा आहे जो सहज ओळखता येत नाही. याला ‘हाय-फंक्शनिंग अॅन्क्झायटी’ असे म्हणतात.
हे क्लिनिकल निदान नसून एक अशी मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्ती बाहेरून आत्मविश्वासू आणि यशस्वी दिसते; पण आतून ती सतत भीती, काळजी आणि तणावाने ग्रासलेली असते.
अशा लोकांकडून अनेकदा उत्कृष्ट कामगिरी अपेक्षित असते. ते वेळेत काम पूर्ण करतात, तपशीलाकडे बारकाईने लक्ष देतात, परिपूर्णतेकडे झुकतात आणि नेहमीच इतरांना मदत करतात.
बाहेरून सगळं सुरळीत दिसत असलं तरी त्यांच्या मनात सतत विचारांचा कल्लोळ सुरू असतो. रात्री मन शांत करता न आल्यामुळे झोपेचा त्रास होतो.
शारीरिक लक्षणांमध्ये मान-खांद्यातील ताण, अस्वस्थता किंवा पोटाशी संबंधित त्रास दिसू शकतो.
ही स्थिती धोकादायक ठरू शकते कारण अशा व्यक्तींना यशस्वी समजले जाते, त्यामुळे ना इतरांना त्यांच्या समस्यांची जाणीव होते, ना ते स्वतः ती मान्य करतात.
जर स्वतःमध्ये किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये अशी लक्षणे दिसली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञ थेरपिस्ट किंवा समुपदेशकाशी बोलणे हा पहिला उपाय ठरू शकतो.