Next

मंत्री गेले अन् खड्डे उखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:07 AM2017-11-24T00:07:44+5:302017-11-24T00:11:01+5:30

राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बीड जिल्हा दौरा निश्चित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. परंतु मंत्री जाताच हे खड्डे उखडू लागले आहेत. अवघ्या ३६ तासांत या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाल्याने बांधकाम विभागाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट कामाचा केवळ ३६ तासांत पर्दाफाश

बीड : राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बीड जिल्हा दौरा निश्चित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. परंतु मंत्री जाताच हे खड्डे उखडू लागले आहेत. अवघ्या ३६ तासांत या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाल्याने बांधकाम विभागाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. अधिका-यांकडून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम केल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारमुळे जिल्ह्यातील सर्वच रस्ते खडतर झाले आहेत. पावलोपावली खड्डे पडल्याचे दिसते. दिवसात छोटे-मोठे अपघात होतात. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची साधी डागडुजीही करण्यात आली नव्हती. परंतु चंद्रकांत पाटील यांचा बीड जिल्हा दौरा निश्चित झाला अन् बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या पायाखालची वाळूच सरकली.आपल्या कारभाराचे पितळ उघडे पडू नये, यासाठी त्यांनी मंत्री येणार असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविले. एक दिवस या मार्गावरील वाहनधारकांना प्रवासाचा आनंद घेता आला, परंतु हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. अवघ्या ३६ तासातच बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले.खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने लाखो रुपयांचे टेंडर काढले. गुत्तेदारांनाही आपल्या नेहमीच्या शैलीत हे काम निकृष्ट केले. मंत्री येईपर्यंत हे खड्डे पक्के राहिले. परंतु गुरूवारी याची परिस्थिती वेगळीच होती. अनेक खड्डे उखडल्याचे दिसून आले. यावरून हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले, याचा प्रत्यय येतो. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. नाईकवाडे यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.मंत्री अन् गुत्तेदाराला केले खुशबांधकाम विभागाच्या अधिका-यांनी खड्डे बुजविण्यासाठी लाखोंची उधळपट्टी केली. याच्या माध्यमातून बांधकाम मंत्र्यासमोरही त्यांना आपले काम दिसले तर दुस-या बाजूला गुत्तेदारही खुश झाले. परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान मंत्री ज्या मार्गाने येणार होते त्या मार्गावरीलच खड्डे बुजविण्यात आले होते. इतर ठिकाणचे खड्डे आजही अपघातास निमंत्रण देत आहेत.