Washim ZP : एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:17 AM2021-03-02T11:17:48+5:302021-03-02T11:18:03+5:30

Washim ZP शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.

Washim ZP Exercise to spend Rs 75 crore in a month | Washim ZP : एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत

Washim ZP : एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना सन २०१९-२० या वर्षात शासनाकडून १३४ कोटींचा निधी प्राप्त झाला. गत २३ महिन्यांत अर्थात फेब्रुवारी २०२१ पर्यंत ५९ कोटी रुपये खर्च झाले असून, शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला शासनाकडून विविध माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. या निधीतून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. वाशिम जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे अंदाजपत्रक जवळपास १० कोटींच्या घरात असते. या निधीतून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचविणे शक्यच नाही. स्वनिधीबरोबरच जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. 
जिल्हा परिषदेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नसल्याचा दावा एकीकडे केला जातो, तर दुसरीकडे दरवर्षी निधी अखर्चित राहत असल्याचे चित्रही पाहावयास मिळते. सन २०१९-२० या वर्षात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना जवळपास १३४ कोटींचा निधी मिळाला. 
हा निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्ष असून, ३१ मार्च २०२१ पूर्वी संपूर्ण निधी खर्च होणे बंधनकारक आहे. यानंतर अखर्चित राहणारा निधी शासनजमा केला जातो. 
१३४ कोटींपैकी आतापर्यंत ५९ कोटी रुपये खर्च झाले असून, शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपये खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे. विहित कालावधीत निधी खर्च करण्याचे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. आता एका महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनाला पेलावे लागणार आहे. 

निधी खर्च करताना या विभागांची होणार दमछाक!
सन २०१९-२० या वर्षात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी, जलसंधारण या विभागांना शासनाकडून निधी मिळाला होता. सद्यस्थितीत प्रत्येक विभागाचा निधी काही प्रमाणात अखर्चिक असून, मार्च २०२१ पूर्वी खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी एका महिन्यात खर्च करताना संबंधित विभागांची चांगलीच दमछाक होणार आहे.


जिल्हा परिषदेला सन २०१९-२० या कालावधीत प्राप्त झालेला निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २०२१ अशी आहे. सध्या शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपूर्वी पूर्णपणे खर्च कसा होईल, याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे.
- मंगेश मोहिते, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम


जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना प्राप्त झालेला निधी विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन झाले आहे. निधी अखर्चिक राहून शासनजमा होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. १० मार्चपर्यंत पुन्हा आढावा घेऊन ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या जातील. 
- चंद्रकांत ठाकरे, 
अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम

Web Title: Washim ZP Exercise to spend Rs 75 crore in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.