वाशिम जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 11:14 AM2021-08-05T11:14:31+5:302021-08-05T11:14:36+5:30

Washim district on the threshold of corona Free : रुग्णच नसल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाचा अपवाद वगळता इतर सर्वच कोविड केअर सेंटर पूर्णत: रिक्त झाले आहेत.

Washim district on the threshold of corona Free | वाशिम जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

वाशिम जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर!

Next

- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात आजमितीस ऑक्सिजनवर दोन आणि व्हेंटिलेटरवर एक असे केवळ तीन रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील दोघांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याने जिल्हा कोरोनामुक्तीच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. दरम्यान, उपचार घेण्याकरिता रुग्णच नसल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाचा अपवाद वगळता इतर सर्वच कोविड केअर सेंटर पूर्णत: रिक्त झाले आहेत.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. १५ फेब्रुवारीपर्यंत कायम राहिलेल्या संसर्गाच्या या पहिल्या लाटेत बाधितांचा एकूण आकडा ७ हजार ४३० वर पोहोचला होता. 
यासह संसर्गाने १५६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर घेण्यात आली होती. त्यानंतर आलेली दुसरी लाट मात्र तुलनेने अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. विशेषत: मार्च ते मे हे तीन महिने जिल्ह्यासाठी अत्यंत त्रासदायक होते. 
दुसऱ्या लाटेत ३ ऑगस्ट २०२१ अखेर तब्बल ३४ हजार २३८ नवे रुग्ण निष्पन्न झाले; तर ४८० जणांना संसर्गाची बाधा होऊन जीव गमवावा लागला. या कालावधित जिल्ह्यात सुरू झालेले शासकीय व खासगी कोविड केअर सेंटर रुग्णांच्या गर्दीने खचाखच भरलेले असायचे. 
वेळप्रसंगी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड रिक्त नसल्याने गरजूंची चांगलीच ओढाताण झाली. दरम्यान, मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत गेली; तर जुलै महिन्यात केवळ २१० नवे रुग्ण आढळले. तसेच १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत ८ रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली असून, जिल्हा कोरोनामुक्तीच्या अगदी निकट पोहोचल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 
सद्यस्थितीत वाशिम येथील एकमेव जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दोन रुग्ण ऑक्सिजनवर आणि एकजण व्हेंटिलेअर बेडवर उपचार घेत असून, अन्य सर्व कोविड केअर सेंटर रुग्णमुक्त झाले आहेत.


२५ कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये 
जिल्ह्यात दैनंदिन आढळत असलेले कोरोनाचे नवे रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण, बरे झालेले आणि संसर्गाने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांचा अहवाल जाहीर केला जातो. पोर्टलवरून घेतल्या जात असलेल्या या आकडेवारीत ४ ऑगस्टअखेर ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा २८ दर्शविण्यात आला आहे. त्यातील केवळ तीन रुग्ण शासकीय दवाखान्यात उपचार घेत असून, उर्वरीत २५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ वाशिमच्या स्त्री रुग्णालयात दोन ऑक्सिजनवर आणि एक रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. ऑक्सिजनवरील दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याने त्यांनाही लवकरच ‘डिस्चार्ज’ दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त शासकीय रुग्णालयांमध्ये कोविडने बाधित एकही रुग्ण उपचारार्थ भरती नाही.
- डाॅ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

Web Title: Washim district on the threshold of corona Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.