उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:55 AM2020-07-14T10:55:45+5:302020-07-14T10:56:00+5:30

१५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला.

Mangrulpeer, Risod 'Lockdown' from tomorrow! | उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’!

उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जुलै महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर, रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वाजता या दरम्यान केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. वाशिम, मालेगाव, कारंजा व मानोरा या शहरांमध्ये सुद्धा लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू होणार आहे. या चारही शहरांमधील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना सुरु ठेवण्याचा कालावधी १५ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी लोकांनी फिजिकल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मंगरूळपीर आणि रिसोड या दोन शहरांमध्ये १५ जुलै ते २१ जुलै २०२० या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे.


‘लॉकडाऊन’च्या कालावधीत बँक व्यवहारही बंद राहणार
मंगरूळपीर व रिसोड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच राष्ट्रीयकृत बँकांसह अन्य बँकांमध्येही ग्राहक, शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात मंगरूळपीर व रिसोड शहरातील सर्व बँक शाखा बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपये पर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाºया नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जावून रक्कम अदा करण्याची कार्यवाही करेल. सकाळी ७ ते १० वाजतापर्यंतच्या काळात एटीएममधून पैसे काढण्यास मुभा राहील, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले.

 

 

 

Web Title: Mangrulpeer, Risod 'Lockdown' from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.